सायबरपीस फौंडेशनचा अहवाल : जुन्या विंडोज सर्वरमध्ये घुसले हॅकर्स
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतातील लसउत्पादक आणि रुग्णालयांच्या विरोधातील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नवी दिल्ली येथील थिंक टँक सायबर पीस फौंडेशनच्या नव्या संशोधनानुसार 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान सुमारे 80 लाख सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे. हे सायबर हल्ले विशेष स्वरुपात भारताच्या आरोग्य क्षेत्रावर आधारित ‘थ्रेट इंटेलिजेन्स सेंसर’ नेटवर्कशी संबंधित होते.
अहवालानुसार थेट इंटेलिजेन्स सेंसर नेटवर्कवर ऑक्टोबरमध्ये एकूण 54,34,825 आणि नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत एकूण 16,43,169 सायबर हल्ल्यांची ओळख पटविण्यात आली आहे.
जुन्या विंडोज सर्वरवर हल्ला

अहवालानुसार सायबर हल्ले अनियंत्रित इंटरनेट यंत्रणेला तोंड देणाऱया प्रणालीवर सर्वाधिक करण्यात आले आहेत. इंटरनेट-फेसिंग सिस्टीममध्ये रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल (आरडीपी) अनेबल असतो, असे संशोधनात दिसून आले आहे. जुन्या विंडोज सर्वर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सायबर हल्ले झाले आहेत.
या संकटादरम्यान आरोग्य क्षेत्रावर अनेक रॅन्समवेअर अटॅक झाले आहेत, जे एप्रिल 2020 पासून सुरू झाले होते. कोविड-19 दरम्यान नेटवाल्क रॅन्समवेअर, पोनिफिनल रॅन्समवेअर, माजे रॅन्समवेअर यांच्यासह अन्य रॅन्समवेअरचा वापर झाल्याचे फौंडेशनने म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टने लावला शोध
चालू महिन्यात मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने कोविड-19 लस निर्माण करणाऱया भारतासह अन्य देशांमधील 7 प्रमुख कंपन्यांना लक्ष्य करणाऱया सायबर हल्ल्यांचा शोध लावला होता. यात कॅनडा, फ्रान्स, भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या प्रमुख औषध कंपन्या तसेच लस संशोधक सामील होते. हा हल्ला रशिया आणि उत्तर कोरियातून करण्यात आला होता. परंतु मायक्रोसॉफ्टने लसउत्पादकांची नावे जाहीर केलेली नाहीत. लसीची चाचणी सुरू असलेल्या कंपन्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे. यातील एक क्लीनिकल रिसर्च संस्था चाचणी करतेय, तर दुसऱया कंपनीने कोविड-19 लस चाचणी पूर्ण केल्याचे मायक्रोसॉफ्टचे पदाधिकारी टॉम बर्ट यांनी दिली आहे.









