कोरोनाची लस खात्रीलायकरित्या तयार झाली की नाही हे ईश्वरालाच ठाऊक. पण ती बाजारात यायच्या आधीच देशात तिच्या स्टेट्सवरून हाणामारी चालू झाली आहे आणि ती वाढणार आहे. वेगवेगळय़ा कंपन्या आपापल्या लशीचे गुणगान गात आहेत. ‘लस लवकर आणा हो, नाहीतर कोरोनाची साथ ओसरून जाईल. मग तिचा काय उपयोग?’ असे विनोद व्हॉट्सअप विद्यापीठात फिरू लागले आहेत.
लस विकत मिळेल की फुकट हे अजून निश्चित नाही. बिहारच्या निवडणुका झाल्या तेव्हा एका केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की आमचे सरकार आल्यावर बिहारमध्ये सर्वांना लस फुकट मिळेल. पण आता सरकार म्हणते की सर्वांना लस लगेच देणे शक्मय नाही. विरोधकांनी टीका सुरू केली आहे की गेली साठ वर्षे आमच्या सरकारने सर्व लशी संपूर्ण देशाला फुकट दिल्या, तुमचे सरकार मात्र लशीचे पैसे मागू बघते आहे, वगैरे.
चीन, रशिया, अमेरिका आणि आपल्या देशातही लस बनते आहे. आता अमुक देशातली लस टोचून घेणारा कम्युनिस्ट, तमुक देशातली लस टोचून घेणारा भांडवलदार, भारतीय लस टोचून घेणारा देशभक्त असे वर्गीकरण अद्याप सुरू झालेले नाही. प्रथेप्रमाणे लस बनवण्याचे कंत्राट सरकारी कंपनीऐवजी खाजगी कंपनीला मिळाल्यावर ‘कर लो टीका कंबर पे’ अशी जाहिरात येऊ शकेल, पण आली नाही. सरकारी आणि मोफत लशीची जाहिरात करायला अमिताभराव सज्ज आहेतच.
मोफत लस आलीच नाही तर किती लोक विकत घेतील देव जाणे. पोलिओचा मोफत डोसदेखील घेण्याचा आपल्या लोकांनी कंटाळा केलेला आहे. मग विकत कोण घेतो. श्रीमंतांना लस, मध्यमवर्गीयांना एन-95 मास्क आणि गरिबांना तोंडावर रुमाल हेच शेवटी दिसून येईल. ‘पतिव्रतेच्या गळय़ात धोंडा…’ च्या चालीवर ‘गरीबांच्या नाकावर फडके, श्रीमंतांना लस’ असे म्हणता येईल.
‘होम मिनिस्टर’च्या स्पर्धेत विजेत्या वहिनींना भावजी इंपोर्टेड लस टोचतील आणि हरलेल्या वहिनींना रंगीबेरंगी मास्क देतील.’
मनपाच्या निवडणुकांचे ढोल अजून वाजले नाहीत. ते वाजले तर यंदाच्या संक्रांतीला नगरसेवकपदाचे इच्छुक आपापल्या वॉर्डातल्या भगिनींना हळदीकुंकवाला बोलावून मास्कचे वाटप करतील. मास्कवर इच्छुक उमेदवाराचे नावदेखील छापता येईल. मतदानाच्या वेळी मात्र ते मास्क लावून जाता येणार नाही.








