ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर इश्फाक उर्फ अबू अक्रमचा समावेश आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शोपियांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री शोधमोहीम हाती घेण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाणार नाहीत, म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर इश्फाक उर्फ अबू अक्रम याच्यासह अन्य एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.









