जिल्हा मुख्याध्यापक संघ जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, सचिव कुसगावकर यांची माहिती
वार्ताहर / कणकवली:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा दीड महिना बंद आहे. पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार आहे हे निश्चित नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अध्ययन -अध्यापन प्रक्रियेत आणण्यासाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्याध्यापक संघाच्यावतीने मुख्याध्यापकांना या बाबत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वामन तर्फे व सचिव गुरुदास कुसगावकर यांनी दिली.
ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक कृती कार्यक्रम तयार केला आहे. याचा पहिला टप्पा राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक अत्तार (शिरगाव हायस्कूल) यांच्या सहकार्याने 30 एप्रिलपासून सुरू करण्यात आला.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे देता येईल?, याबाबत मार्गदर्शन अत्तार व वाकरे हायस्कूल कोल्हापूरचे मुख्याध्यापक भगवान पाटील यांनी केले. या बाबतचे दुसरे सत्र शनिवारी घेण्यात आले. जिह्यातील मुख्याध्यापकांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या शिक्षकांना या प्रवाहात आणावे, असे आवाहन तर्फे व कुसगावकर यांनी केले आहे. पुढील टप्प्यात शिक्षकांना अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असून विद्यार्थी हिताचा विचार करून सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









