यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा उपक्रम
प्रतिनिधी / सावंतवाडी:
विद्यार्थ्यांच्या हितावह अनेक उपक्रम साध्य करणारे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱया यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी तसेच यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसीने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ संकल्पना राबिवली आहे. देशांतर्गत असलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता तसेच त्यांच्या अभ्यासात व्यत्यय न येण्यासाठी गेले महिनाभर या संकल्पनेचा वापर महाविद्यालयामार्फत करण्यात येत आहे.
यामध्ये बी. फार्मसी तसेच डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते आणि त्यावर आधारित ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे गुण दिले जातात. ‘लर्न फ्रॉम होम’साठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्हिडिओ, पीपीटी प्रेझेन्टेशन तयार करून विद्यार्थ्यांना लिंक उपलब्ध करून देत आहेत. यासाठी सर्व प्राध्यापकांनी गुगल क्लासरुम, जीनोमीओ यासारख्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विध्यार्थ्यांसाठी आभासी वर्ग (virtual classroom) तयार केली आहेत. या आभासी वर्गांचा उपयोग करून प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, नोट्स, प्रश्नावली पाठवत आहे आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमास लाभत आहे. या प्रक्रियेत वन-टू-वन पद्धतीचा वापर व्हॉट्सऍपच्या माध्यमातून करून येणाऱया अडचणींचे निरासन महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक करत आहेत. अशाप्रकारे अध्यापन प्रक्रिया पार पाडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाहीच शिवाय त्यांचा शिक्षणावरील अतिरिक्त खर्च वाचेल आणि ते आत्मविश्वासाने त्यांचे करिअर करू शकतील, असा आत्मविश्वास महाविद्यालयास आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांना व्हॉट्सऍप तसेच फेसबुक पेजच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी माहिती दिली जात आहे.
यासाठी प्राध्यापकांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप तसेच डी. फार्मसीचे प्राचार्य तुषार रुकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









