वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांशी साधला प्रत्यक्ष संवाद
वृत्तसंस्था/ लडाख
भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाची परिस्थिती ताजी असतानाच शनिवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लडाखचा दौरा केला. प्रत्यक्ष सीमेवर जात त्यांनी वरिष्ठ फिल्ड कमांडरांशी संवाद साधत सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
मे महिन्याच्या प्रारंभीच लडाखमधील वादाच्या मुद्यांच्या अनुषंगाने चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव दोन्ही देशांच्या अधिकाऱयांनी चर्चेअंती मिटवला असला तरी त्याठिकाणी कोणत्याही क्षणी चीनकडून कुरापती काढल्या जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी लडाखला भेट देत परिस्थिती जाणून घेतली. गालवल नाला, डेमचौक, दौलत बेग आणि पैंगोंग त्सो झील आदी ठिकाणांवरून भारत आणि नेपाळमध्ये तणाव आहे. गालवल नाला येथेच दोन्ही देशांचे 300-300 सैनिक आमने-सामने आले होते. मात्र, भारतीय लष्कराच्या फिल्ड कमांडरांनी पुढाकार घेत चीनच्या कमांडर्सशी सलोखापूर्ण बोलणी सुरू करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबतच सखोल पाहणी व अभ्यास करण्यासाठी लष्करप्रमुखांनी थेट लडाख गाठले आहे.
दोन्ही देशांनी सैन्यबळ वाढवले
लडाखमधील पैंगोंग त्सो झील आणि गालवल घाटी येथेही दोन्ही देशांनी आपले सैन्यबळ वाढवलेले आहे. दोन आठवडय़ांपासून या भागातही तणावाची स्थिती आहे. याच मुद्यावरून येथेही दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरांच्या उपस्थितीत बैठका-चर्चा सुरू आहेत. मात्र, यात कोणत्याही समस्यांचे पूर्णपणे निराकरण झाले नसल्याने संघर्षाची धार कायम आहे.
भारताच्या रस्तेनिर्मितीमुळे चीनची आदळापट
लडाखमधील डोंगराळ भागात भारताने रस्ते निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केल्याने चीन अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताच्या रस्तेनिर्मितीला विरोध केला आहे. मात्र, भारताने रस्त्यांचे काम सुरूच ठेवल्याने या भागात चीनने आपले सैन्य वाढवले आहे. त्यानंतर भारतानेही अधिक फौज मागवल्याने दोन्ही देश आमने-सामने आले आहेत. चीन ज्याप्रमाणे आपल्या हद्दीमध्ये रस्तेनिर्मिती करत आहे त्याचपद्धतीने भारतही रस्त्यांची कामे करत असल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे. मात्र, भारताच्या रस्तेनिर्मितीला चीनचा विरोधी सूर कायम आहे.









