लष्करी जवानासह दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या लग्नाला अडसर ठरलेल्या पेयसीचा विष पाजवून खून करणाऱया तरुणासह दोघा जणांविरुद्ध चिकोडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी बेळगाव जिल्हा भोवी (वड्डर) सोशल वेल्फेअर सोसायटीने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष ए. एस. ममदापूर व सचिव शंकर हादिमनी यांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांना गुरुवारी निवेदन दिले असून अंकली (ता. चिकोडी) येथील राजू बाळाप्पा हिरेकुरबर व त्याचा मित्र सुरेश बाळू ढंग या दोघा जणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दीपाली अंकुश पवार (वय 25) ही तरुणी पुण्यात नोकरी करीत होती. 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी राजू व त्याचा मित्र सुरेश या दोघा जणांनी तिला चिकोडीला बोलावून घेऊन विष पाजले आहे. नंतर तिला चिकोडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचाराचा उपयोग न होता सिव्हिलमध्ये तिचा मृत्यू झाला आहे.
राजू हा सैन्य दलात असून त्याला अटक करण्यात आली आहे. भोवी वड्डर समाजातील तरुणीचा विष पाजून खून करणाऱया आरोपींना कायद्याचा हिसका दाखवावा व त्या तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चिकोडी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.









