तीन जणांना घेतले पोलिसांनी ताब्यात, केवळ 18 बाटल्या सापडल्या
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून लक्ष्मी टेकडीचा उल्लेख होतो. याच टेकडीवर तब्बल सहा ठिकाणी अवैध दारुचे धंदे राजरोसपणे सुरु आहेत. कोणी विरोध केला तर त्यालाच बेदम मारहाण करुन अवैध व्यवसाय करणाऱयांची मुजोरी सुरु असते. महिन्यात दोन वेळा दारु व्यवसायिकांनी मारहाण केल्याच्या घटना घडल्या त्यामुळे नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यावर बुधवारी गराडा घालून कैफियत मांडली. त्यानंतर पोलिसांनी गेली दोन दिवस लक्ष्मी टेकडी परिसरात कोंबिग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. परंतु दोन दिवसामध्ये पोलिसांना केवळ 1200 रुपयांच्या 18 बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचे कोंबिग ऑपरेशन म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढण्यासारखे आहे.
सातारा शहरातील सदरबझार परिसरातल्या लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत अलिकडच्या काळात प्रतापसिंहनगरसह इतर भागातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. अवैध व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर फोफावत चालले आहेत. ते बंद करण्यात यावेत असे अनेकदा मागणी स्थानिकांनी केली होती. यापुर्वी सदरबझार परिसरातील अवैध व्यवसाय स्थानिकांच्या मागणीनुसार बंद करण्यात आले होते. परंतु पुन्हा अवैध व्यवसाय वाढले गेले अन् दारु विक्रेत्यांचा उत्तमात सुरु झाला. एकाच महिन्यात दो घटना घडल्या. ज्यांच्या घरासमोर बेकायदेशीर दारु विक्री केली जाते. त्यांच्याच घरात एका महिलेला भाडेकरु म्हणुन दारु विक्रेत्यांनी पाठवले अन् त्या घरमालकाने पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून त्या घरमालकास मारहाण केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. मारहाण केल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर पुन्हा ते दारु विक्रेते उजळ माथ्याने त्या परिसरात दारु विक्री जोमात करु लागले. तसेच बुधवारी एका युवकास दारु विक्रेत्याने मारहाण केल्याने पुन्हा ऐरणीवर विषय आला. त्याच अनुषंगाने बुधवारी लक्ष्मी टेकडीवर पोलिसांनी सर्च मोहिम राबवली. त्यानंतर गुरुवारी कोबिंग ऑपरेशन केले.
पोलीस आले पळापळा…
लक्ष्मी टेकडीवर सहा ठिकाणी दारुचे व्यवसाय अवैधरित्या चालतात. त्यानुसार जेथे जेथे अवैध व्यवसाय चालतात त्या ठिकाणी वेगळय़ा वर्णनाचा एखादा जरी व्यक्ती निदर्शनास आला की लगेच पोलीस आले पळापळा अशी कुजबुज सुरु होती. त्यामुळे दारु विक्री करणारे लगेच पोबारा करतात.








