सुदीप ताम्हणकर यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या गोवा भेटीवर सावर्डे भागात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणव्यवसाय सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. खाणविषयावरून गोमंतकीयांची भाजप सरकारने दिशाभूल केली आहे. प्रत्येक घटक उपासमारीने होरपळून गेला असून त्यांच्यावर फक्त अन्याय करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वेळोवेळी गरीब घटकांना मदत केली आहे. त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. गरीब घटकाचे विषय धडाडीने सोडविण्याची धमक पार्सेकर यांच्यात असून त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी गोमंतकीयांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
भाजप सरकारला प्रत्येक पावलावर अपयश आले असून याविषयी प्रयत्न केलेले दिसून येत नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर खाणव्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले जाते. 2012पर्यंत खाणव्यवसाय सुरळीत सुरू होता. या व्यवसायामुळे गोमंतकीयांचे पोट भरत होते. परंतु 201<8 साली खाणलीज रद्द करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने लिलाव करण्याचा सल्ला दिला होता. परंतु भाजप सरकारने हा सल्ला न मानता खाणपट्टीला वेठीस धरले. खाणमालक, खाणअवलंबितांवर उपासमारीची वेळ आली आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना प्रत्येकवेळी फसविले आहे असा आरोप ताम्हणकर यांनी यावेळी केला.









