वृत्तसंस्था/ ढाका
शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात लंकेने बांगलादेशचा 97 धावांनी पराभव केला. मात्र तीन सामन्यांची मालिका यजमान बांगलादेशने 2-1 अशा फरकाने जिंकली. 16 धावांत 5 बळी मिळविणाऱया दुश्मंता चमीराला सामनावीर आणि बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
या शेवटच्या औपचारिक सामन्यात लंकेने 50 षटकांत 6 बाद 286 धावा जमविल्या. लंकेच्या डावात कर्णधार कुशल परेराने शानदार शतक (120) तर धनंजय डिसिल्वाने नाबाद अर्धशतक (55) झळकविले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने चार गडी बाद केले. त्यानंतर चमीरा, हसरंगा व रमेश मेंडिस यांच्या भेदक माऱयासमोर बांगलादेशचा डाव 42.3 षटकांत 189 धावांत आटोपला. मोसद्देक हुसेन (51) व मेहमुदुल्लाह (53) यांनी अर्धशतेक झळकवली तर रहीमने 28, तमिम इक्बालने 17 व अफिफ हुसेनने 16 धावा काढल्या. चमीराने 5 तर हसरंगा व रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
या मालिकेत बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली होती. लंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 286 धावा जमविल्या. कर्णधार कुसल परेराने 122 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 120, धनंजय डिसिल्वाने 70 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 55, सलामीच्या गुणतिलकाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 39, कुसल मेंडिसने 1 षटकारासह 22 आणि हसरंगाने 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. गुणतिलका आणि कर्णधार कुसल परेरा यांनी सलामीच्या गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुसल परेराने कुसल मेंडिससमवेत तिसऱया गडय़ासाठी 69 धावांची भर घातली. डिसिल्वा आणि कुसल परेरा यांच्यात चौथ्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी नोंदविली गेली. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 46 धावांत 4 तर एस. इस्लामने एक गडी बाद केला.
बांगलादेशच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. लंकेच्या चमिराने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशची स्थिती शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 10 षटकात 3 बाद 30 अशी केविलवाणी होती. कर्णधार तमिम इक्बाल 17, नईम 1, शकीब अल हसन 4 धावावर बाद झाले. बांगलादेशचे हे तिन्ही फलंदाज चमिराने 6 धावांच्या मोबदल्यात बाद केले.
संक्षिप्त धावफलक- लंका 50 षटकात 6 बाद 286 (कुशल परेरा 120, धनंजय डिसिल्वा नाबाद 55, गुणतिलका 39, कुशल मेंडिस 22, हसरंगा 18, तस्कीन अहमद 4-46, एस. इस्लाम 1-56). बांगलादेश 42.3 षटकांत सर्व बाद 189 (मोसद्देक हुसेन 51, मेहमुदुल्लाह 53, रहीम 28, चमीरा 5-16, हसरंगा 2-47, मेंडिस 2-40).









