वृत्तसंस्था/लंडन
येत्या जानेवारी महिन्यात इंग्लंडचा संघ लंकेच्या दौऱयावर जाणार असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयानंतर इंग्लंडचा संघ भारतात दाखल होणार असून उभय संघात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. लंकन दौऱयासाठी अष्टपैलू स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज आर्चर यांना विश्रांती देण्याचा निर्णय इंग्लंडच्या क्रिकेट निवड समितीने घेतला आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू भारताच्या दौऱयामध्ये सहभागी होणार आहेत.
लंकन दौऱयासाठी इंग्लंडच्या निवड समितीने 16 जणांचा संघ जाहीर केला असून स्टोक्स आणि आर्चर यांना वगळले आहे. त्याचप्रमाणे या दौऱयासाठी 7 राखीव खेळाडूंची इंग्लंडच्या निवड समितीने निवड केली आहे. 2 जानेवारीला इंग्लंडचा संघ श्रीलंकेला रवाना होणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी 14 जानेवारीला गॅलेच्या मैदानावर तर दुसरी कसोटी याच मैदानावर 22 जानेवारीपासून खेळविली जाणार आहे. हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना आयोजित केले जाणार आहेत. हंबनटोटा येथे इंग्लंडचा संघ दाखल झाल्यानंतर त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या दौऱयासाठी सरेचा फलंदाज बर्न्सलाही वगळले आहे.
इंग्लंडचा संघ- जो रुट (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, बेअरस्टो, बेस, ब्रॉड, बटलर, क्रॉले, करन, फोक्स, लॉरेन्स, लीच, सिबली, स्टोन, वोक्स, मार्क वूड, राखीव खेळाडू- बेसी, पेन, शकीब मेहमूद, ओव्हरटन, पार्किन्सन, रॉबिन्सन, व्हिर्डी.









