प्रतिनिधी / कसबा बीड
रेशन कार्डवरील धान्य पुरवठा यादी ग्रामपंचायतला नाववार देणे गरजेचे आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये सरकारने रेशनकार्ड धारकांना माणसी 5 किलो प्रमाणे तांदूळ द्यायचे जाहीर केले आहे. पण सर्वसामान्य जनतेला तुमचे रेशन कार्ड आधार लिंक नाही, तुमची नावाने धान्य मिळणार नाही अशा पद्धतीचे ऐकावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गरजू लोक या धान्य पुरवठापासून वंचित राहू लागले आहेत. लॉक डाऊनमुळे ज्यांचे हातावरती पोट आहे, मोलमजुरी केल्याशिवाय गुजराण होत नाही,अशा सर्व घटकांवर अन्याय होत आहे.
पुरवठा विभागाकडून रेशन कार्डधारकांना यादी नसल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वाद -विवाद होऊ लागले आहेत. मागील महिन्यांमध्ये विकत मिळणारे धान्य पैसे देऊन दिले जात होते. पण मोफत आलेले धान्य मिळत नाहीत याचा नेमका अर्थ काय ? हा भ्रष्टाचार तर नाही ना ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. काही गावांमध्ये तर किरकोळ वादावादी सुद्धा सुरू आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर यावर उपाययोजना म्हणून रेशन कार्ड वरील धान्य पुरवठा यादी ग्रामपंचायतला नाव देणे महत्वाचे आहेत. तरच होणारे गैरसमज व वाद-विवाद थांबतील व सर्व लोकांचे समाधान होईल.