कणकवली:
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वे मार्गावर सध्या फक्त दोनच रेल्वेगाडय़ा सुरू आहेत. मात्र, राज्यांतर्गत प्रवासाला बंदी असतानाही या गाडय़ांमधून मुंबईतून जिल्हय़ात दाखल होणाऱया चाकरमान्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही स्थानकांवर आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असले, तरीही अनेक प्रवासी तिथे कोणतीही नोंद न करता निघून जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य ती उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’ यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर राज्याबाहेरील अनेक मजूर, कामगार यांच्या समस्या लक्षात घेता मंगला, नेत्रावती या प्रवासी गाडय़ा सुरू करण्यात आल्या. या दोन्ही गाडय़ांमध्ये राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, मुंबईकर चाकरमानी हे सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेरील स्थानकांचे तिकीट काढून प्रवास करू लागले. मंगला एक्सप्रेसला कणकवलीत, तर नेत्रावती एक्सप्रेसला कुडाळमध्ये थांबा असल्याने त्याचा फायदा घेत हे प्रवासी जिल्हय़ात दाखल होऊ लागले.
सुरुवातीच्या काळात या दोन्ही गाडय़ांमधून साधारण सात-आठ प्रवासी जिल्हय़ात दाखल होत होते. मात्र, आता ही संख्या वाढत चालली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, नेत्रावती एक्सप्रेसमधून 17 रोजी 42, 18 रोजी 44, 19 रोजी 61, 20 रोजी 26, तर मंगला एक्सप्रेसमधून 17 जुलैला 21, 18 रोजी 44, 19 रोजी 23, 20 रोजी 18 प्रवासी दाखल झाले आहेत. अर्थातच एवढय़ा मोठय़ा संख्येने दाखल प्रवाशांच्या नोंदी करून घेताना आरोग्य कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱयांचीही तारांबळ उडत आहे. त्याचाच फायदा घेत काही प्रवासी हे नोंद न करता तेथून निघून जात आहेत.









