सोलापूर / प्रतिनिधी
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्यावतीने रेल्वेच्या खाजगीकरणाच्या विरोधात सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर येथे ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शना व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख नेतृत्वाखाली आज गुरुवारी महात्मा गांधी पुतळा येथे सकळी ११ वाजता रेल्वे खाजगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील ५० टक्के पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या, १ लाख २५ हजार रिक्त पदे तातडीने भरा, प्रतिगामी धोरणे घेणारे मोदी सरकार मुर्दाबाद, रेल्वे मजदूर एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा गगनभेदी आवाजात घोषणा देत सारा परिसर दुमदुमून सोडले व निषेधाचे फलक दाखवत तीव्र निदर्शने केली.
भारत सरकारने १०९ रेल्वेमार्गावर १५१ खाजगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल चे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. व आता क व ड गटाच्या रिक्त असलेली ५० टक्के पदे रद्द करण्याचा व नवीन पदनिर्मिती वर प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे जमिनीसह खाजगीकरण करणार आहे. रेल्वे डबे कारखाना व इंजन कारखाना खाजगीकरण करून त्याला वेगळे करून शेअर्स मार्केटमध्ये त्याचे शेअर्स ठेवणार आणि त्याचे खाजगी कंपनीत रुपांतर करणार. खरे पाहता रेल्वे तिकीट दरामध्ये ४७ टक्के अनुदान आहे. या रेल्वेमधून दरवर्षी सरकारला २००० अब्ज महसूल मिळतो. अर्थातच भारतीय अर्थ व्यवस्थेची रक्तवाहिनी असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रामधील अत्यंत महत्वाचे व स्वतंत्र अर्थसंकल्प असलेले रेल्वे खाते सरकार या देशातील करबुडव्या, दिवाळखोर नफेखोर भांडवलदारांना रेल्वेचे खाजगीकरण करून आंदण म्हणून देण्याचा घाट घातलेला आहे. रेल्वे म्हणजे देशाच्या अर्थ व्यवस्थेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार अंडी विकण्याऐवजी कोंबडीच विकायला निघाले. म्हणजेच पुन्हा देश गुलामीकडे नेण्याचे द्योतक असल्याची टीका कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.
यावेळी सोलापूर शहर आयुक्तालय मार्फत पोलीस प्रशासन व अधिकारी आंदोलन स्थळी तैनात करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला, गंगुबाई कनकी आदिना पोलिसांनी आंदोलनाच्या अगोदरच ताब्यात घेऊन दत्त नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. पोलीस व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी माकपच्या १३८ कार्यकर्त्यांना अटक केले.
सदर आंदोलनात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. म.हनीफ सातखेड, कॉ. रंगप्पा मरेड्डी, मुरलीधर सुंचू, अशोक बल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे, दाउद शेख, बापू साबळे, यांच्यासह शेक़डो कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleबेंगळूर : ४८ तासासाठी दोन खासगी रुग्णालये सील
Next Article माढा तालुक्यातील आणखी दोन कोरोनाबाधितांची भर








