रेल्वे म्हणजे भारतातील दळणवळणाचं, सार्वजनिक वाहतुकीचं मुख्य साधन…खरं तर कोटय़वधी लोकांसाठी ती ‘जीवनवाहिनी’च म्हणायला हवी. पण ‘कोरोना’ विषाणूचं संकट ओढवल्यानंतर जसं अनेक सेवांवर गंडांतर येऊन त्या बंद ठेवाव्या लागल्या त्याचप्रमाणं रेल्वेची प्रवासी वाहतूकदेखील अचानक ब्रेक लागून ठप्प झाली. मुंबईतील लोकल ही कधीच बंद झालेली लोकांना माहीत नसेल. पण यावेळी ते दृष्य देखील पाहण्याची वेळ आली…एरव्ही जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं असलेली भारतीय रेल्वे दररोज 13 हजार रेल्वेगाडय़ांतून 2 कोटी 30 लाख प्रवाशांची वाहतूक करायची. परंतु 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आल्यापासून रूळांवरून धडधडत धावणाऱया प्रवासी रेल्वेचा आवाज बंद झाला. 16 एप्रिल रोजी रेल्वेचा 167 वा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला तो याच नीरव शांततेच्या पार्श्वभूमीवर. रेल्वेच्या इतिहासात असं घडण्याची ही पहिलीच खेप…मात्र याचा अर्थ रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प राहिलीय असा नव्हे, फक्त तिची मुख्य भूमिका बदललीय. लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याकरिता या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात आलाय. रस्त्यानं होणारी मालवाहतूक विस्कळीत झालेली असताना ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला तो रेल्वेच्या मालवाहतुकीनं. जनसामान्यांची दैनंदिन गरज भागविण्याच्या बाबतीत मोलाची भूमिका पार पाडली ती ‘पार्सल ट्रेन्स’नी…हे महत्त्वपूर्ण योगदान कसं अथकपणे देण्यात येतंय त्याचीच ही माहिती…
जीवनावश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा…
देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतरीत्या व्हावा याकरिता रेल्वेची मालवाहतूक 24 तास अखंड चालू ठेवण्यात आली. 24 मार्च ते 20 एप्रिल यादरम्यानच्या काळात 10.13 लाखांहून जास्त वाघिणींतून वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. यापैकी 6.53 लाखांहून अधिक वाघिणींनी अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदा, फळे, भाजीपाला, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा व खते असा माल वाहून नेला आणि देशभरात तो पुरविण्यात आला…‘लॉकडाऊन’मुळं झालेली कोंडी नि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यावर सरकारनं दिलेला भर यामुळं प्रचंड वाढ झाली ती अन्नधान्याच्या वाहतुकीत. ही वृद्धी 88.21 टक्के इतकी राहिली. एकटय़ा एप्रिल महिन्यातच 40 लाख टन इतकं अन्नधान्य वाहून नेण्यात आलं. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात हा आकडा राहिला होता 16 लाख टन…
खासगी कंपन्या, व्यापाऱयांना मोलाचा आधार…
लॉकडाऊनमुळं रस्त्यावरील वाहतुकीत बाधा आलेली असताना भारतीय रेल्वेनं केलेल्या या पुरवठय़ाचा मोलाचा आधार झाला तो खासगी कंपन्या व व्यापाऱयांना. 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत त्यांच्या 7.75 लाख टनांहून अधिक (303 ‘रॅक्स’) अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षातील त्याच कालावधीचा विचार करता वाहतूक झाली होती ती 6.62 लाख टन इतक्या खासगी अन्नधान्य साठय़ाची (243 ‘रॅक्स’). याबाबतीत आघाडीवर राहिलीत ती आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान व तामिळनाडू यासारखी राज्यं. यापूर्वी खासगी अन्नधान्याच्या साठय़ाची बहुतांश वाहतूक व्हायची ती रस्त्याच्या मार्गानं…याखेरीज रेल्वेनं आपल्या ‘रो-रो’ (रोल-ऑन-रोल-ऑफ) सुविधेचा वापर करून मालानं भरलेल्या अनेक ट्रकांना नेण्याचं कामही पार पाडलं…
अन्नधान्याची विक्रमी वाहतूक…
लॉकडाऊनच्या काळात गरिबांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकारांनीदेखील त्यांना रेशन मोफत देण्याची घोषणा केली. त्याला अनुसरून ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’च्याखाली नीट वाटप करता यावे यासाठी रेल्वेने विक्रमी प्रमाणात अन्नधान्याची वाहतूक केली. 25 मार्च ते 25 एप्रिल या एका महिन्याचा विचार करता 52 लाख टन अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली. 2019 मधील त्याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीनं जास्त…22 एप्रिल रोजी 112 ‘रॅक्स’ म्हणजे 3.13 लाख टन इतका माल रेल्वेत चढविण्यात आला. हा एक नवा उच्चांक. यापूर्वीची विक्रमी कामगिरी होती 92 ‘रॅक्स’ची म्हणजेच 2.27 लाख टनांची आणि ती नोंदली गेली होती 9 एप्रिल रोजी…अन्नधान्यामध्ये गहू प्रामुख्यानं पंजाब व हरीयाणातून, तर तांदूळ चंदिगड, ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडूतून चढविण्यात आला. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) सहकार्यानं माल चढविणे, वाहतूक व उतरविणे ही प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात मोठय़ा प्रमाणात डाळींचीही वाहतूक करण्यात आली…
वैद्यकीय साहित्याच्या पुरवठय़ास प्राधान्य
सारा देश ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेला असताना रेल्वेनं वैद्यकीय साहित्य नि औषधं यांचा सतत पुरवठा होत राहील याची काळजी घेण्यास प्राधान्य दिलंय. ‘पार्सल ट्रेन्स’च्या माध्यमातून फेस मास्क, औषधं, इस्पितळांना लागणाऱया विविध वस्तू आणि अन्य वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यात येत असून रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आला होता तो 1150 टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा…आसामातील सिल्चरसारख्या ठिकाणचा मालवाहतुकीसाठीचा टर्मिनल प्रथमच औषधांच्या पार्सल सेवेसाठी उपयोगात आणला गेला…
पोहोचतं केलं उंटाचं दूध…
या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस) अधिकाऱयांची ‘सेतू’ नामक सेवा तयार करण्यात आलीय. त्यामागचा हेतू ज्या खास मागण्या आहेत त्या पूर्ण करून जीवनावश्यक गोष्टी घरपोच करण्याचा. देशभरातून औषधांचा तातडीनं पुरवठा करण्याची मागणी करणारे जे ‘कॉल्स’ येतात त्यांनाही हाताळलं जातं ते याच सेवेकडून…ही मानवतावादी भावनेतून वावरणारी व्यवस्था कशी काम करते याचं चांगलं उदाहरण दोन ‘ऑटिस्टिक’ मुलांवरून देता येईल. मुंबईतील एक साडेतीन वर्षांचा ‘ऑटिस्टिक’ मुलगा फक्त उंटाचं दूध आणि काही मर्यादित डाळी यांचंच तेवढं सेवन करत असल्यानं अन् त्याला बकरी, गाय वा म्हशीच्या दूधाची ऍलर्जी असल्यानं त्याच्या पालकांसमोर मोठं संकट उभं झालं. मग त्याच्या आईनं ‘ट्विटर’वरून विनंती केली ती सादी, राजस्थानमधून उंटाचं दूध वा दुधाची भुकटी पुरविण्याची. त्याची दखल घेत रेल्वेकडून लुधियाना नि बांद्रादरम्यान धावणाऱया खास रेल्वेगाडीला राजस्थानच्या फालना स्थानकावर दूध गोळा करण्यासाठी थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे सदर कुटुंबाला उंटाचं 20 लिटर ‘स्किम्ड’ दूध पुरविण्यात आलं…त्याचप्रमाणं गंभीर आजाराचा सामना करणाऱया अजमेरमधील एका ‘ऑटिस्टिक’ मुलाला देण्यात येणाऱया औषधांचा साठा संपल्यानं मोठा बाका प्रसंग उद्भवला होता. सदर कुटुंबाच्या नातेवाईकांनी रेल्वेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर आवश्यक औषधं अहमदाबाद ते अजमेर या मार्गावर धावणाऱया पार्सल ट्रेनमधून पोहोचती करण्यात आली…
कर्नाटकातून गुजरात, राजस्थानमध्ये ट्रक्टर्स…
शेतीची कामे ऐन जोमात आलेली असताना कृषी क्षेत्राची गरज भागविण्याच्या दृष्टीनं दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून कर्नाटकातील दोड्डबळळापूरमधून गुजरात, राजस्थानमध्ये ट्रक्टर्स पोहोचते करण्याची कामगिरी पार पाडण्यात आलीय. दोन दिवसांत 1720 किलोमीटर्सचं अंतर कापून अहमदाबादनजीक 175 ट्रक्टर्स पोहोचते करण्यात आले. त्याशिवाय तीन दिवसांत 2160 किलोमीटर्सचं अंतर कापून राजस्थानमधील कनकपूरपर्यंत वाहतूक करण्यात आली ती तितक्याच टॅक्टर्सची…
67 मार्गांवर ‘पार्सल ट्रेन्स’…
फळं, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ आदी जीवनावश्यक वस्तूंसह शेतकऱयांना बियाणांचा पुरवठा नीट व्हावा याकरिता रेल्वेनं 67 मार्गांवर सुरू केल्या त्या ‘पार्सल ट्रेन्स’. 24 मार्चपासून एप्रिलच्या मध्यासपर्यंत अशा 507 रेल्वेगाडय़ा चालविण्यात आल्या आणि 20 हजार 400 टन मालाची वाहतूक करण्यात आली. त्यातून कमाई झाली ती 7 कोटी 54 लाखांची…दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलुरू, हैदराबादसह अनेक शहरांना अखंडित पुरवठा व्हावा याकरिता वेळापत्रकानुसार धावणाऱया खास ‘़पार्सल ट्रेन्स’ चालविण्यात आल्याहेत…महाराष्ट्रात भुसावळसारख्या ठिकाणाहून रेल्वेतून यापूर्वी कांदा नेला जायचा, तर केळी रस्तामार्गे नेली जायची. मात्र लॉकडाऊनच्या काळात येथून दिल्लीत केळय़ांची ‘पार्सल व्हॅन’ पाठविली गेली. त्यानंतर फळविक्रेत्यांच्या मोठय़ा प्रमाणात मागण्या येऊ लागल्यानं मध्य रेल्वेवर पाळी आली ती फळांच्या वाहतुकीसाठी कित्येक गाडय़ा सोडण्याचा विचार करण्याची…महाराष्ट्रातील शेतकऱयांना राज्याची खासियत असलेला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविणं शक्य झालं ते कोकण रेल्वेच्या थिरूअनंतपूरम ते ओखा या मार्गावर धावणाऱया खास ‘पार्सल ट्रेन’मुळं. आंध्र प्रदेशातील आंब्यांना देखील दिल्लीतील बाजारांचं दर्शन घडलं ते अशाच प्रकारे…त्याचप्रमाणं मध्य रेल्वेनं पालनपूर, गुजरात येथून हरयाणा व दिल्लीत केली जाणारी दूधाची वाहतूक प्रचंड वाढविलीय. 23 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत 14 ‘मिल्क स्पेशल्स’नी वाहतूक केली ती 9903 टन दुधाची…
– संकलन : राजू प्रभू








