दादर-सावंतवाडी-दादर धावणार रेल्वे : केंद्रीय रेल्वे बोर्डाची परवानगी : 19 बोगींची सुविधा : आजपासून आरक्षण
प्रतिनिधी / कुडाळ:
केंद्रीय रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वे मार्गावरुन येत्या 26 सप्टेंबरपासून ‘कोविड मान्सून स्पेशल’ दादर-सावंतवाडी-दादर अशी रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे. कोकण रेल्वेने दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस स्पेशल रेल्वे म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तुतारीच्याच वेळापत्रकानुसार ही रेल्वे धावणार आहे. 19 बोगी या रेल्वेसाठी असतील.
ही रेल्वे पूर्णपणे आरक्षण करून चालविण्यात येणार आहे. 24 सप्टेंबरपासून या रेल्वेचे आरक्षण पीआरएस सेंटर, आयआरसीटीसी वेबसाईट व इंटरनेटवर सुरू करण्यात येणार आहे. राज्य व केंद्रीय ‘कोविड-19’चे सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचे सर्व नियम पाळून या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.
26 सप्टेंबर रोजी म्हणजे 25 रोजी मध्यरात्रीनंतर रात्री 12.05 वाजता दादर येथून 01003 दादर-सावंतवाडी ही रेल्वे सावंतवाडीकडे रवाना होईल. दुपारी 12.20 वाजता सावंतवाडीत ही रेल्वे पोहोचेल, तर सावंतवाडीतून 01004 सावंतवाडी-दादर ही रेल्वे 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सावंतवाडी स्थानकावरुन सुटून दुसऱया दिवशी सकाळी 6.45 वाजता दादरला पोहोचेल. 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही रेल्वे मान्सून वेळापत्रकानुसार मान्सून स्पेशल रेल्वे म्हणून धावेल. या रेल्वेला 19 बोगी असतील. 4 जनरल, 8 स्लीपर्स, 4 बोगी थ्रीटायर एसी, 1 बोगी टू टायर एसी व अन्य 2 मिळून 19 बोगी असतील.
रेल्वे बोर्डाने 22 सप्टेंबर रोजी ही रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे. लवकरच या रेल्वेचे आरक्षण कधी सुरू होणार, याबाबत कोकण रेल्वे अधिकृतपणे जाहीर करणार आहे.
दादर-सावंतवाडी मान्सून स्पेशल
01003 दादर-सावंतवाडी ही रेल्वे रात्री 12.05 वाजता दादरहून सुटणार असून ठाणे-12.27, पनवेल-1.10, रोहा-2.40, माणगाव-3.14, वीर-3.36, खेड-4.30, चिपळूण-5.08, सावर्डा-5.34, आरवली रोड-5.48, संगमेश्वर-6.06, रत्नागिरी-7, आडवली-7.43, विलवडे-8.02, राजापूर रोड-8.20, वैभववाडी रोड-8.48, कणकवली-9.28, सिंधुदुर्ग-10, कुडाळ-10.28, सावंतवाडी रोड स्थानकावर दुपारी 12.20 वाजता पोहचणार आहे.
सिंधुदुर्गवासियांची गैरसोय होणार दूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरीलही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. गणेश चतुर्थीनंतर काही दिवस कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली होती. काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा मार्गावरुन धावत आहेत. आता दादर-सावंतवाडी सेवा सुरू केल्याने सिंधुदुर्गवासियांची गैरसोय दूर होणार आहे.
सावंतवाडी-दादर
01004 सावंतवाडी-दादर ही गाडी सावंतवाडीहून सायंकाळी 5.30 वाजता सुटून कुडाळ-5.48, सिंधुदुर्ग-6.06, कणकवली-6.26, वैभववाडी रोड-7, राजापूर रोड-7.20, विलवडे-7.38, आडवली-7.58, रत्नागिरी-9.20, संगमेश्वर-9.58, आरवली रोड-10.18, सावर्डा-10.34, चिपळूण-10.54, खेड-11.30, वीर-रात्री 1.16, माणगाव-1.36, रोहा-3.15, पनवेल-4.45, ठाणे-5.42, दादरला सकाळी 6.45 वाजता पोहोचेल.
1 नोव्हेंबरपासून नॉन मान्सून वेळापत्रक
1 नोव्हेंबरपासून दादर-सावंतवाडी ही रेल्वे दादर येथून रात्री 12.05 वाजता सुटून ठाणे-12.30, पनवेल-1.15, चिपळूण-4.52, रत्नागिरी-6.20, वैभववाडी रोड-सकाळी 7.48, नांदगाव रोड-8.12, कणकवली-8.28, सिंधुदुर्ग-8.46, कुडाळ-9, सावंतवाडीला 10.40 वाजता पोहोचेल.
सावंतवाडी-दादर ही रेल्वे सावंतवाडी येथून सायंकाळी 6.50 वाजता सुटून कुडाळ-7.10, सिंधुदुर्ग-7.26, नांदगाव रोड-8, वैभववाडी रोड-8.18, रत्नागिरी-10, चिपळूण-11.56, पनवेल-पहाटे 4.45, ठाणे-5.42 व 5.45 वाजता दादरला पोहोचणार आहे.









