आप नेत्या अलिना साल्ढाणा यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
नियोजित रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा तसेच दक्षिण गोव्यातील गावांमधून जाणाऱया सदर मार्गाची सर्वोच्च न्यायालयाने पाहणी करावी, अशा मागण्या आम आदमी पक्षाने केल्या आहेत.
मंगळवारी पणजी आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी आपच्या नेत्या तथा माजी मंत्री अलिना साल्ढाणा, वाल्मिकी नाईक आणि उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांची उपस्थिती होती.
कॅसलरॉक-कुळे रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्य जीव मंडळाने दक्षिण पश्चिम रेल्वेला दिलेली पर्यावरणीय मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबद्दल साल्ढाणा यांनी आभार व्यक्त केले. आता दक्षिण गोव्यातील गावांमधून जाणाऱया रेल्वे दुपदरीकरण मार्गाच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित होतो. या मार्गाचा तेथे राहणाऱया लोकांवर काय परिणाम होईल? ज्या वातावरणात ते राहतात त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
दक्षिण पश्चिम रेल्वे ट्रकच्या दुपदरीकरणाविरूद्ध ग्राम कृती समिती’चे सदस्य तसेच साल्ढाणा यांनी प्रकल्पाची गंभीरता जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निमंत्रित केले होते. प्रकल्पाची वास्तविकता ऐकल्यानंतर मुख्यमंत्री सावंत स्तब्ध झाले. तरीही दुर्दैवाने हे सर्व रोखण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप मात्र केला नाही असे साल्ढाणा पुढे म्हणाल्या.
ग्रामस्थांचा लढा कौतुकास्पद ः नाईक
प्रकल्पाची वास्तविकता तपासल्याशिवाय राष्ट्रीय वन्य जीव मंडळाने ऑनलाइन बैठकीदरम्यान परवानगी दिली होती. त्या प्रकल्पाच्या विरोधात युवकांनी सातत्याने लढा दिला. त्यातून हा राष्ट्रीय मुद्दा बनला. त्याबद्दल श्री. नाईक यांनी युवकांचे कौतुक केले.
या प्रकल्पाला सीईसीने अकार्यक्षम, अन्यायकारक आणि पूर्णतः विनाशकारी, म्हटले आहे. हा प्रकल्प गोव्यासारख्या लहान राज्यासाठी अनावश्यक आहे. या प्रकल्पाचा हेतू कधीच गोमंतकीयांच्या हितासाठी नव्हता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही सर्व योग्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे नाईक पुढे म्हणाले.
हा गोमंतकीयांचा विजय ः कुतिन्हो
दरम्यान, हा प्रकल्प अडविण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या गोमंतकीयांचा हा मोठा विजय आहे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱया कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खटले आता मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.









