रेल्वे इंजिनालाही ट्रकवरुन प्रवास करावा लागतो, ही घटना आपल्याला आश्चर्यकारक वाटू शकते. कारण रेल्वेतून ट्रकची वाहतूक आता सर्वसामान्य झाली आहे. तथापि, हरियाणातील अंबाला येथे एका 106 चाकांच्या ट्रक-ट्रॉलीवर एक अवाढव्य रेल्वे इंजिन चढविण्यात आल्याची आणि ते लुधियाना येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये पोहचविण्याची घटना नुकतीच घडली आहे.
हे इंजिन अपघाताने एका मोठय़ा खड्डय़ात पडले होते. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. ही दुरुस्ती करण्याची व्यवस्था अंबाला येथे नव्हती. ही दुरुस्ती केवळ लुधियाना येथील वर्कशॉपमध्येच होऊ शकत होती. त्यामुळे हे इंजिन तेथे नेणे भाग होते. त्यासाठी हा सारा खटाटोप करावा लागला. हे इंजिन खड्डय़ातून काढण्यासाठी तब्बल 67 दिवस लागले. यासाठी अनेक क्रेन्स उपयोगात आणावे लागले. या इंजिनाचे वजन 140 टन आहे. त्यामुळे ते उचलण्यासाठी बरेच कष्ट उठव<ावे लागले. अखेरीस ते बाहेर आल्यानंतर 106 चाकांच्या लांबलचक ट्रक-ट्रॉलीवर महत्प्रयासाने चढविण्यात आले. त्यानंतर त्याचा प्रवास सुरु झाला. हा सर्व प्रकार घडत असताना तेथे लोकांची प्रचंड गर्दीही जमली होती. कारण त्यांच्यासाठी हे सर्व नवीन होते. अशा या इंजिनाच्या अपघाताचीही चौकशी सुरु असून आतापर्यंत बेपर्वाईच्या कारणास्तव आठ कर्मचारी निलंबित झाले आहेत









