सिंधुदुर्गला दिलासा : आणखी एक हजार इंजेक्शन्सची मागणी
- जिल्हय़ात आणखी 48 पॉझिटिव्ह रुग्ण, 16 जणांना डिस्चार्ज
- एकूण 1 हजार 916 जण आतापर्यंत कोरोना मुक्त
- कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 105
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित अती गंभीर रुग्णांसाठी महागडी ‘रेमडेसिवीर’ची पाचशे इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच आणखी एक हजार इंजेक्शन्सची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिली. सोमवारी जिल्हय़ात आणखी 48 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.
कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये व्याधिग्रस्त आणि वयोवृद्धांचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येकाचा जीव वाचणे महत्वाचे आहे. काही गुंतागुंतीच्या स्थितीत असलेल्या तसेच अती गंभीर रुग्णांना महागडे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन दिले, तर त्या रुग्णांचा जीव वाचण्याची शक्मयता अधिक असते. त्यामुळे रेमडेसिवीरची पाचशे इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहेत.
जिल्हय़ात आणखी 48 पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हय़ात आणखी 48 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 85 झाली आहे. तसेच सोळा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 1 हजार 916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
मालवण तालुक्मयात पाच कंटेनमेंट झोन
मालवण तालुक्मयात पाच ठिकाणी कंटेनमेंट झोन लागू करण्यात आले आहेत. सदर कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे आहेत. कुणकवळे, नागझर येथे 30 सप्टेंबरपर्यंत, वायरी-भुतनाथ, वराडकरवाडी येथे 30 सप्टेंबरपर्यंत, पिंपळफोंड, मेढा, मालवण येथे 1 ऑक्टोबरपर्यंत, सोमवार पेठ, मालवण येथे 2 ऑक्टोबरपर्यंत, भरड मालवण, मथुरा कॉम्प्लेक्स येथे 2 ऑक्टोबरपर्यंत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 22855
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3085
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 19017
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 753
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1105
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 64
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1916
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8147
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12778









