प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील वडूथ येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय अंकुश मदने याने घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली होती. त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून घरफोडीतील 14 लाख 70 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील पाडळी येथील गोडाऊनमधून अज्ञात चोरटय़ांनी दि. 10 जानेवारी ते दि. 11 जानेवारीच्या दरम्यान 14 लाख 70 हजार रुपयांची पितळेची झुंबरे व सिलिंग फॅन चोरी करुन नेल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती. याच्या तपासाकरता एक पथक तयार करण्यात आले होते. दि. 16 रोजी पोलीस पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय अंकुश मदने (रा. वडूथ) याने तो गुन्हा केला आहे. त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पथकास दिल्या. पथकाने त्यास लगेच ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता चोरी केलेले 14 सिलिंग फॅनपैकी 2 सिलिंग फॅन हस्तगत केले. झुंबराचे साहित्य भंगारात विक्री केले होते. ते दुकान दाखवून चोरीला गेलेले झुंबरही हस्तगत केले. चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, शिवाजी गुरव यांनी केली.








