युवा नेमबाज अनिश भनवालाने पटकावले कांस्यपदक
वृत्तसंस्था/ कैरो, इजिप्त
भारताचा युवा नेमबाज अनिश भनवालाने बारा वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणताना आयएसएसएफ वर्ल्ड कप रायफल पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत 25 मी. रॅपिड फायर प्रकारात कांस्यपदक पटकावले. 12 वर्षांनंतर भारताला या क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळाले आहे.
20 वर्षीय अनिशचे हे वरिष्ठ स्तरावर मिळविलेले वर्ल्ड कपमधील पहिले वैयक्तिक पदक आहे. तीन वेळा संघर्षपूर्ण शूटऑफनंतर त्याला हे पदक मिळाले. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त विजय कुमारने या प्रकारात पदक मिळविले होते. 2012 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने या प्रकारात रौप्यपदक पटकावले होते आणि दोन वर्ल्ड कप स्पर्धांत पोडियमवर स्थान मिळविले होते. इटलीच्या मॅसिमो स्पिनेलाने सुवर्णपदकाच्या शर्यतीत 32 वेळा अचूक वेध घेत सुवर्ण मिळविले तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यविजेत्या फ्रान्सच्या क्लेमेंत बेसॉजला रौप्य मिळाले.

भनवालाने हे पदक त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक हरप्रीत सिंग यांना समर्पित केले. ‘हरप्रीत यांनीही अनेकदा भारतातर्फे अंतिम फेरी गाठल्या आहेत. पण त्यांना पदक जिंकता आले नव्हते. पदक जिंकल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे. याआधी दोनदा अंतिम फेरीत मी पाचवा क्रमांक मिळविला होता. यावेळी ती कसर भरून काढत पहिले पदक मिळविण्याचा मी निर्धारच केला होता,’ असे अनिश म्हणाला. शूटऑफवेळी खेळाडूवर बराच मानसिक ताण येतो. पण मी शांत राहण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचा मला लाभ झाला. दबावाची स्थिती असते त्यावेळी ती स्वतःहून कशी हाताळावी, याचे ट्रेनिंग राष्ट्रीय शिबिरावेळी घेण्यात आले होते, त्याचाही येथे फायदा झाला. पदकाच्या फेरीतील चौथी मालिका खूपच कठीण गेली. त्यात जर्मनीचा ऑलिम्पिक सुवर्णविजेता ख्रिश्चन रीट्झवर मात करावी लागली. हीच मालिका मला स्वप्न साकार करून देऊ शकते असे मी स्वतःला बजावले, तशी कल्पनाही केली आणि परिपूर्णतेने अंमलबजावणी केली. यामुळेच मी आनंदी होऊ शकलो,’ असेही त्याने सांगितले.
सहकाऱयांच्या कामगिरीने प्रेरणा मिळाली का, असे विचारता तो म्हणाला, ‘त्यांची कामगिरी सकारात्मक परिणाम करणारी होती. काल दोन अंतिम लढती पाहिल्या. त्यात ऐश्वर्य तोमर व इतरांनी चांगली कामगिरी केल्यानंतर आपणही हे साध्य करू शकतो, असा विश्वास आला,’ असेही त्याने स्पष्ट केले.
581 गुणांसह सहावे स्थान मिळवित अनिश रँकिंग राऊंडसाठी पात्र ठरला. नंतर एकंदर दुसरे स्थान मिळविले आणि रॅपिड फायर राऊंडमध्ये 267 गुण नोंदवत पात्रता मिळविली. रँकिंग फेरीतील दोन लढतीत त्याच्यासोबत अव्वल खेळाडू होते. ख्रिश्चन रीट्झ व क्लेमेंत बेसॉज पहिल्या रँकिंग राऊंडमधूनच पदकाच्या फेरीत पोहोचले तर मॅसिमो व अनिश यांनी दुसऱया राऊंडमधून आगेकूच केली. मात्र यासाठी त्यांना झेकच्या यान चेसनेलविरुद्ध तीन वेळा शूटऑफ करावे लागले. शूटऑफमध्ये पहिल्या दोन फटक्यात 2 व 3 हिट्स मारत बरोबरी झाली. तिसऱया फटक्यात चेसनेलला दोन हिट्स मारता आले तर अनिशने चार हिट्स मारत बाजी मारली.
महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्समध्ये भारताला पदक मिळू शकले नाही. सिफ्त कौर सामराने पात्रता फेरीत 585 गुण घेत 16 वे तर मानिनी कौशिक (584) व अंजुम मोदगिल (583) यांनी अनुक्रमे 22 व 27 वे स्थान मिळविले.









