- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश
ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.








