जगभरात कोरोना संसर्गाचे एकूण 2,87,616 बळी : रुग्णसंख्या 42,72,828 : रशियातील बाधितांचा आकडा वाढला
जगभरात आतापर्यंत 42 लाख 72 हजार 828 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर या संसर्गामुळे 2 लाख 87 हजार 616 जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियातील कोरोनाबाधितांची संख्या 2,32,243 वर पोहोचली आहे. अमेरिका आणि स्पेननंतर रशिया आता जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रभावित देश ठरला आहे. रशियात आतापर्यंत 2,116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
व्हाइट हाउसमध्ये मास्क अनिवार्य, दोन अधिकाऱयांना लागण

व्हाइट हाउसच्या वेस्ट विंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मास्क परिधान करण्याचे आदेश अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. एका आठवडय़ात व्हाइट हाउसच्या दोन अधिकाऱयांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेच्या दरम्यान मास्क परिधान न करताच प्रसारमाध्यमांना सामोरे गेल्याचे दिसून आले आहे. व्हाइट हाउसमध्ये प्रतिदिन शेकडो लोक येत असतात. महामारी रोखण्यासंबंधी आम्ही चांगले काम करत आहोत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अँथनी फॉसी समवेत तीन अधिकारी स्वयं विलगीकरणात गेले आहेत.
कोरोना अदृश्य शत्रू : ट्रम्प

अमेरिकचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाला अदृश्य शत्रू ठरविले आहे. चालू आठवडय़ात अमेरिकेत 1 कोटी लोकांची चाचणी पूर्ण होणार आहे. ही संख्या कुठल्याही देशापेक्षा दुप्पट आहे. सोमवारी सकाळपर्यंत देशात 90 लाख नागरिकांची चाचणी करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.
? अमेरिकेत सलग दुसऱया दिवशी प्रतिदिन मृतांची संख्या 900 पेक्षा राहिली कमी.
? अमेरिकेत आतापर्यंत 81,795 बळी, तर 13,85,850 एकूण बाधित.
?न्यूयॉर्क प्रांतात सर्वाधिक 27 हजार मृत्यू तर 3 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण.
? उपाध्यक्ष माइक पेन्स यांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल निगेटिव्ह.
स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

इटलीचे सरकार निर्बंध हटविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची अनुमती देणार आहे. इटलीतील एडिज प्रांतात रेस्टॉरंट, बार आणि पुस्तकालये सोमवारपासून सुरू करण्यात आली आहेत. इटलीत आतापर्यंत 30,739 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमध्ये संकट कायम

ब्रिटनमध्ये 24 तासांत 210 जणांचा मृत्यू झाला असून 3,877 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 32,065 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन सरकारने 1 जूनपासुन सर्व क्रीडाप्रकार सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. परंतु या क्रीडास्पर्धांवेळी प्रेक्षक उपस्थित नसतील. या सर्व क्रीडास्पर्धांचे थेट प्रसारण केले जाणार आहे.
पंतप्रधानांची योजना अस्पष्ट

ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर यावी म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडलेल्या योजनेवर टीका केली जात आहे. या योजनेत अनेक गोष्टी स्पष्ट नाहीत. ही योजना भ्रामक तसेच विरोधाभास दर्शविणारी असल्याचा आरोप होतोय. लोकांनी आता स्टे-ऍट-होमच्या ऐवजी स्टे-अलर्टसाठी सज्ज व्हावे असे जॉन्सन यांनी म्हटले होते. परंतु अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करत या बदलाचा अर्थ काय असा सवाल उपस्थित केला आहे.
मॉस्कोत दिवसात 55 बळी

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मागील 24 तासांत कोरोनामुळे 55 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात एक आठवडय़ापासून प्रतिदिन 10 हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असले तरीही सरकारने निर्बंध शिथिल करण्याची तयारी चालविली आहे. रशियात रविवारी 11 हजार 656 रुग्ण सापडले होते.
पेरूमध्ये 68,622 बाधित

पेरू या देशात कोरोना संसर्गाचे 1,515 नवे बाधित सापडले आहेत. तेथील एकूण बाधितांचा आकडा आता 68 हजार 822 वर पोहोचला आहे. राजधानी लीमामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. पेरूमध्ये कोरोनाचा धोका पाहता 24 मेपर्यंत टाळेबंदी वाढविली आहे.
लस निर्मितीसमीप 7-8 कंपन्या

कोरोना लस निर्मितीत 7 ते 8 कंपन्या आघाडीवर असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे लसनिर्मितीच्या कामात वेग आला आहे.
8 अब्ज डॉलर्सची मदत
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसेस यांनी युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलच्या व्हिडिओ ब्रीफिंगमध्ये याची माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरोनावरील लस निर्मितीसाठी 12-18 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वाटत होती. परंतु आता एक त्वरित प्रयत्न केला जात आहे. यात 40 देश, संघटना आणि बँकांकडून संशोधन, उपचार आणि चाचणीसाठी 7.4 अब्ज युरोंची (8 अब्ज डॉलर्स) मदत करण्यात आल्याचे ते म्हणाले.
400 वैज्ञानिकांचे पथक
जागतिक आरोग्य संघटना हजारो संशोधकांसोबत काम करत आहे. लसीची प्राण्यांवरील चाचणी करण्यापासून चाचणीचे स्वरुप निश्चित करत लसनिर्मितीच्या कार्याला गती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या कार्यात 400 वैज्ञानिकांचे एक पथक सामील आहे.
अधिक निधीची गरज
लस शोधून काढण्यासाठी 8 अब्ज डॉलर्सची रक्कम पुरेशी ठरणार नाही. लसनिर्मितीच्या कार्याला वेग देण्यासाठी अधिक निधीची गरज भासणार आहे. लस सर्वांना उपलब्ध होईल याची खातरजमा करावी लागणार असल्याचे ट्रेडोस यांनी म्हटले आहे. लस निर्मितीसाठी 7-8 कंपन्या सर्वात आघाडीवर आहेत. त्यांच्यासह 100 हून अधिक कंपन्या प्रयत्नशील आहेत. उत्तम परिणाम प्राप्त करू शकणाऱया कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करत असून त्यांना पूर्ण मदत उपलब्ध केली जात असल्याची माहिती ट्रेडोस यांनी दिली.
फाविपिराविरची भारतात क्लीनिकल ट्रायल सुरू

ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सने अँटीव्हायरल औषध फाविपिराविरची तिसऱया टप्प्यातील क्लीनिकल ट्रायल भारतात सुरू केली आहे. हे औषध कोरोना संसर्गावरील उपचारात सहाय्यभूत ठरण्याची अपेक्षा आहे. भारतात तिसऱया टप्प्यातील चाचणी करणारी पहिलीच कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ग्लेनमार्कला कोविड-19 रुग्णांवर चाचणी सुरू करण्याची मंजुरी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने दिली आहे. अँटीव्हायरल औषध फाविपिराविरला जपानच्या फुजीफिल्म होल्डिंग्स कॉर्पोरेशनची सहाय्यक कंपनीकडून निर्मिती एविगन अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. 2014 साली फ्लूविरोधी औषध म्हणून याच्या वापराला मंजुरी देण्यात आली होती.
ऑगस्टपर्यंत चाचणी पूर्ण होणार आहे. कंपनीने आरअँडडी पथकाच्या माध्यमातून उत्पादनासाठी एपीआय आणि फॉर्म्युले विकसित केले आहेत. फाविपिराविर इन्फ्ल्युएंजा विषाणूच्या विरोधात वापरले गेले आहे. जपानमध्ये हे औषध कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वापरले जात आहे.
आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्ल्यू

कोरोना संकटादरम्यान आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूचा कहर सुरू झाला आहे. आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूने आतापर्यंत 10 जिल्हय़ांमध्ये 14 हजारांपेक्षा अधिक डुकरांचा जीव घेतला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱयांना डुकरांचे मृतदेह खोलवर पुरण्याचा सल्ला दिला आहे. तर नागरी वस्तीत डुक्कर शिरू नये, याकरता खंदक खणण्यात आला आहे.
राज्यातील 10 जिल्हय़ांमध्ये 14,465 डुकरांचा आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्य सरकार संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलत असल्याची माहिती पशूपालन मंत्री अतुल बोरा यांनी दिली आहे.
माजुली, गोलाघाट आणि कामरुप, दिब्रूगढ, शिवसागर, जोरहाट, धेमाजी, लखीमपूर तसेच विश्वनाथ या जिल्हय़ांमध्ये संसर्ग फैलावला आहे. बोरा यांनी काझीरंगा अभयारण्याचा दौरा करत रानडुकरांना वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
खबरदारीचे उपाय
6 फूट खोल आणि दोन किलोमीटर लांबीचे खंदक तयार करत अन्य गावांमधून डुक्कर उद्यानात येऊ नयेत याची खबरदारी घेण्यात आली आहे. प्राण्यांना आजारापासून वाचविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय डुक्कर संशोधन केंद्रासोबत मिळून काम करावे असा निर्देश राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिला आहे.
पर्यायी मार्ग निवडू
2019 च्या गणनेनुसार राज्यात डुकरांची संख्या 21 लाख होती, परंतु आता हे प्रमाण 30 लाख झाले आहे. केंद्राकडून मंजुरी मिळूनदेखील राज्य सरकारने डुकरांना त्वरित न मारण्याचा निर्णय घेतला आहे. आजाराचा फैलाव रोखण्याचा पर्याय निवडण्यात आल्याचे बोरा म्हणाले.









