ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशी स्थिती कायम राहिली आणि लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
ते म्हणाले, लोकांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. दरम्यान, सरकारने देखील कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नाईट क्लब वर कारवाई सुरू केली आहे. ज्या हॉटेलमध्ये नियमांचे पालन न करता 50 % पेक्षा जास्त लोकांना बसवले जाते अशा मालकांवर कारवाई सुरू केली आहे. जे पर्याय सरकारकडून राबवता येतील ते राबवले जात आहे. तरी देखील अशीच रुग्ण संख्या वाढत राहिल्यास आणि आवश्यकता जाणवल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते.
- ठाण्यात 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.








