अमेरिकेत सर्वाधिक 1 लाख रुग्ण : संयुक्त राष्ट्रसंघाच्या 86 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण: युरोपीय देशांमध्ये गंभीर संकट
जगभरातील 195 देशांमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केला असून आतापर्यंत 27370 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 1,34,279 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जगभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 6,07,166 झाली आहे. केवळ युरोपमध्ये 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर इटलीतील रुग्णांची संख्या चीनपेक्षा अधिक झाली आहे. इटलीत 86498 रुग्ण सापडले असून शुक्रवारी मृतांची संख्या सर्वाधिक राहिली आहे. 24 तासांत तेथे 919 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर आतापर्यंत एकूण 9134 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या 86 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.
स्पेनमध्ये सैन्य तैनात

स्पेनमध्ये 24 तासांत 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या 5138 वर पोहोचली आहे. युरोपमध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्स हे देश कोरोनाने सर्वाधिक ग्रस्त आहेत. तिन्ही देशांमध्ये आतापर्यंत 16267 जणांनी जीव गमावला आहे. स्पेनच्या सरकारने महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्य तैनात केले आहे. तेथील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढल्याने अन्य देशांची मदत घ्यावी लागत आहे.
अमेरिकेत लाखाहून अधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 104256 झाली आहे. तेथील एकूण बळींची संख्या 1704 झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2.2 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठा दिलासा पॅकेज आहे. या निधीचा वापर कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केला जाणार आहे. अमेरिका सद्यकाळात सर्वात मोठय़ा बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे. देशात सुमारे 33 लाख लोकांनी बेरोजगार म्हणून नोंदणी केली आहे.
चीन करणार मदत

अमेरिकेने कोरोनाग्रस्त 64 देशांना महामारीला तोंड देण्यासाठी 174 दशलक्ष डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांतर्गत भारताला 2.9 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 21.7 कोटी रुपये) मदत मिळणार आहे. चीन कोरोनाशी संबंधित विदा अमेरिकेला पुरविणार आहे. चीनच्या अनुभवाचा अभ्यास करत अमेरिका पावले उचलणार आहे. लॉकडाउनमध्ये आईवडिलांसोबत राहणाऱया मुलांनी चांगले वर्तन करावे, स्वतःचे हात वारंवार धुवावेत आणि देशाबद्दल अभिमान बाळगावा, अशी सूचना ट्रम्प यांनी केली आहे.
टॉम हँक्स पत्नीसह लॉस एंजिलिसमध्ये परतले

हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन शुक्रवारी लॉस एंजिलिस येथे परतले आहेत. अभिनेता आणि त्याची पत्नी ऑस्ट्रेलियात 14 दिवस विलगीकरण कक्षात हेते. एल्विस या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान 11 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली होती.
वुहानमध्ये बंधने शिथिल

चीनमध्ये कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू ठरलेल्या वुहान शहरात प्रवासावरील बंधने शिथिल करण्यात आली आहेत. जानेवारी महिन्यापासूनच शहरातील 1.1 कोटी लोक स्वतःच्या घरात स्थानबद्ध होते. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ विलग राहिल्यावर शहर शनिवारी अंशकालीन स्वरुपात खुले करण्यात आले आहे. लोक शहरात प्रवेश करू शकत असले तरीही तेथून बाहेर पडू शकत नाहीत. हुबेई प्रांतातील अनेक कारखाने पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. वुहान शहरामध्ये संसर्गापासून मुक्त झालेल्या लोकांना पुन्हा बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. शहराच्या अनेक विलगीकरण कक्षाच्या आकडेवारीच्या आधारावर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या सुमोर 5-10 टक्के रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची पुष्टी झाली आहे.
फ्रान्समध्ये संकटाची तीव्रता वाढली

फ्रान्समध्ये एका दिवसात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील सरकारने देशातील टाळेबंदी 15 दिवसांनी वाढविली आहे. तेथे 15 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू राहणार आहे. फ्रान्समध्ये 32964 रुग्ण असून 1995 जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानात गंभीर संकट
पाकिस्तानच्या न्यायालयाने 1200 पेक्षा अधिक कैद्यांची मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबण्यात आलेल्या तुरुंगात संसर्ग फैलावण्यापासून रोखण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानात 1408 रुग्ण असून 11 जणांना जीव गमवावा लागला आहे.
इराणमध्ये रुग्ण वाढले

कोरोनाने इराणमध्ये 2517 जणांचा जीव घेतला असून एकूण रुग्णांची संख्या 35408 झाली आहे. तर 11679 जण संसर्गापासून मुक्त झाले आहेत. इराणने 7 दिवसांकरता सामाजिक दुराव्याची योजना लागू केली आहे. यांतर्गत प्रवासावर बंदी तसेच सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. पश्चिम आशियामध्ये इराणलाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अमेरिकेचा तळ तात्पुरता बंद

जपानच्या योकोसुका येथील अमेरिकेच्या नौदलाच्या तळावर दोन सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कारणामुळे नौदलाचा तळ 48 तासांसाठी बंद करण्यात आला आहे. जपानमध्ये आतापर्यंत 1499 रुग्ण आढळले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे.









