रुक्मिणीने कृष्णाचे पाय सोडले नाहीत. तिच्या डोळय़ातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती स्फुंदून रडू लागली. तिच्या डोळय़ातून आलेल्या अश्रूंनी कृष्णाचे चरणप्रक्षालन झाले. कृष्ण भगवान हसले.
देखोनि बोलाची चातुरी । मग उचलली दोहीं करिं ।
आलिंगिली प्रीतीं थोरी । बंधू न मारिं सर्वथा ।
मस्तकवपना आणा पाणी । नाही आड ना विहीरवणी ।
घाला वाटेचें वाटावणी । विनोद मेहुणीं मांडिला ।
अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसीं ।
विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेसीं बांधिला ।
रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन ।
वेगें करिं लिंबलोण । सकळ जन हांसती ।
रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण ।
बळिराम येऊनि आपण । बंधमोचन करील त्यासी। परिहारमिषें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एका जनार्दनीं विनोद । परमानंद प्रगटेल ।
रुक्मिणीचे बोलण्यातील चातुर्य पाहून श्रीकृष्णाला आनंद झाला. त्याने दोन्ही हातांनी धरून रुक्मिणीला उठवले व रुक्मिणीची विनंती मान्य करून रुक्मीला ठार न मारता केवळ शिक्षा द्यायचे ठरविले. आता न मारता कसे मारायचे. क्षत्रियाची मानखंडना, विरूपकरण म्हणजे त्यांचा शस्त्राशिवाय केलेला वधच आहे. म्हणून रुक्मीचे विरूपकरण करावयाचे ठरले. रुक्मीला पकडून त्याचा गळा रथाला बांधला. कृष्ण हसून म्हणाला-अरे! पाहता काय? मस्तक वपन करण्यासाठी पाणी घेऊन या. आमच्या मेहुण्याची गंमत करू. मग कृष्णाने आपल्या बाणाच्या अग्राने रुक्मीची अर्धी मिशी काढली व डोक्मयावरच्या केसाचे पाच पाट काढले. तो थट्टेने रुक्मिणीला म्हणाला-भीमकी! आपल्या भावाचे तोंड पहा. काय सुंदर दिसत आहे! निंबलोण आणा व त्याची दृष्ट काढा. रुक्मिणी बिचारी अतिशय व्याकुळ झाली. कृष्णाच्या आज्ञेने सैनिकांनी रुक्मीची अजून विटंबना केली. डोक्मयाला पाच बेलफळे बांधली. एक डोळा चुन्याने पांढरा केला. कानाला उंबरे बांधली. हातात तेलाचा कोलू दिला. अशा प्रकारे त्याला बहुरुपी केला. शेवटी बलरामाने धाव घेतली व रुक्मिला बंधमुक्त केला. ती कथा पुढे सांगेन असे एकनाथ महाराज म्हणतात.
येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर ।
लोटले येरयेरांसमोर । घायें नि÷gर हाणिती ।
दक्षिणराजे निजभारिं । युद्ध पाहती राहोनि दूरी ।
रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी उठावले ।
उरलें रुक्मियाचें दळ । यादवीं त्रासिले प्रबळ ।
वर्षोनियां बाणजळ । वीर सकळ भेदिले ।
यादवांच्या तिखट बाणीं । निधडे वीर पदिले रणीं।
धडमुंडांकित धरणी । अर्धाक्षणीं तिहीं केली ।
कृष्णें रुक्मिया बांधिल । उरलिया सैन्या पळ सुटला। जयो यादवांसी आला । मग परतला बळीभद्र । सरोवरामाजी कमलीं । गज करी रवंदळी। तैशी मर्दूनी शत्रुफळीं । कृष्णाजवळी तो आला । रुक्मियाचे विरूपकरण । देखता झाला संकर्षण । कृपा द्रवलें अंत:करण । दीन वदन देखोनी ।
Ad. देवदत्त परुळेकर







