प्रद्युम्नाला त्याच्या पूर्व पराक्रमांची जाणीव करून दिल्यानंतर मायावती पुढे म्हणाली
जैंहूनि हरिलें तुज शंबरें । तैंहूनि माता आर्तस्वरें। विलाप करिते तें उत्तरें। ऐक निर्धारें तुज कथितें ।परिशोचति ते माता। कुररीव गतप्रजा । पुत्रस्नेहाकुला दीना । विवत्सा गौरिवातुरा । कुररी म्हणिजे पक्षिणी टिटवी। अंडविनाशें विलपे जेंवि । तैसी तव माता शोकार्णवीं। गतप्रजत्वें पडलीसे । रसने रस सेवितां न रुचे । शोकें शब्दार्थ न सुचे । स्पर्शज्ञान नोहे त्वचे । बळें उपभोग जाणविती । पदार्थ नोहळे दिसतां नयनीं। सुगंध दुर्गंध नुमजे घ्राणीं । ऐसी तव दु:खें रुक्मिणी । सचेत शोकाग्नीमाजि जळे। हृदयीं धडके शोकानळ। तेणें उद्विग्न व्याकुळ । गृहामाजि सर्वकाळ । कंठी वेळ म्लानत्वें । राजमंदिरिं वृश्चिकें चोर । डंखिला करूं न लाहे सोर । तैसी शोकवेदनाप्रचुर । धैर्यें कलेवर सांवरी । सांगों न शके कोणापासीं । विलाप करी बैसोनि रहसीं । वागतां स्फुंदे उकसाबुकसीं । सखिया दासी सान्तविता । यास्तव विलंब न करिजे येथ। शीघ्र साधीं येथींचें कृत्य । शौर्यें वधीं पां शंबर दैत्य। माता शोकार्त जाणोनी । दीनवदना पुत्रस्नेहें। मूर्च्छित व्याकुळ पडे मोहें । विगतवत्साधेनुन्यायें भर्जितलाहेसम मिडके ।
मायावती प्रद्युम्नाला म्हणाली-हे प्रभो! तुम्ही लहान बालक असतानाच तुमच्या मातेच्या प्रसूतीकक्षातून संबरासूराने तुम्हाला पळवले तेव्हापासून तुमची माता रुक्मिणीदेवी अत्यंत दु:खी होऊन आर्तस्वरात विलाप करीत आहे. टिटवीची अंडी जर कोणी फोडून टाकली तर ती जसा विलाप करते तशी आपली माता विलाप करीत आहे. तिच्या जिभेला चव कळत नाही. तिच्या त्वचेला स्पर्श कळत नाही. तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. डोळय़ांनी पदार्थ पाहिला तर ओळखता येत नाही. तिला सुगंध दुर्गंध यातील फरक कळत नाही. जिवंतपणी ती शोकाग्नीत जळत आहे. हृदय शोकाग्नीत जळत असल्याने ती घरात गुपचूप म्लान होऊन पडलेली असते. एखादा चोर चोरी करण्यासाठी राजवाडय़ात शिरला आणि नेमका तिथे त्याला विंचू चावला, तर तो ओरडूही शकत नाही. तशी रुक्मिणी मनोमन विव्हळते पण धैर्याने कशीबशी जीव तगवून आहे. ती कोणाला आपले दु:ख सांगूही शकत नाही. उस्काबस्की स्फुंदत राहते. त्यामुळे आता तुम्ही विलंब करू नये. शौर्याने शंबरासूराचा वध करावा आणि लवकर आपल्या आईला भेटून तिला शोकमुक्त करावे. ती अत्यंत दीनवाणे मुख करून व्याकुळ होऊन वारंवार मूर्च्छित होऊन पडते. एखादी लाही भाजून काढावी तशी तिची अवस्था झाली आहे.
यास्तव आतां त्वरा करिं । विद्या कथितें ते स्वीकारिं ।
मायाप्रयोग मंत्राक्षरिं । अस्त्ररहस्यें घेई कां ।
ऐसें बोलोनि बोधिली विद्या । मायावती नामप्रसिद्धा।
जीमाजि अनेक माया सिद्धा । दैत्यकुविद्यानाशक जे । महात्मा जो प्रद्युम्न बलि । त्याकारणें विद्या कथिली ।महामायानामाथिली । जे बोलिली धनुर्वेदीं।
Ad. देवदत्त परुळेकर








