बाजार मूल्यांचा उच्चांक गाठणारी पहिली भारतीय कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील बहुचर्चित रिलायन्स उद्योग समुहाने 11 लाख 43 हजार 667 कोटी रुपयांची अर्थात 150 अब्ज डॉलर्स बाजारमूल्य असणारी कंपनी म्हणून नवा विक्रम नोंदवला आहे. एवढे बाजारमूल्य असणारी ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. लॉकडाऊन, कोरोना संकट असतानाही गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्समध्ये कोटय़वधी रुपयांची विविध देशातील कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
सोमवारी शेअर बाजार सुरु होताच पहिल्या तेजीच्या लाटेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड 150 अब्ज डॉलर्सचे बाजारमूल्य प्राप्त करणारी पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्सचे बाजारमूल्य 28,248.97 कोटी रुपये वाढून 11 लाख, 43 हजार 667 कोटी अर्थात 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.
रिलायन्स शेअरला सर्वोत्तम किंमत
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवरच्या (बीएसई) प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये दबाव निर्माण करणाऱया या कंपनीचे सुरुवातीला 2.53 टक्के उसळी घेत 1804.10 रुपये इतक्या विक्रमी किमतीवर झेप घेतली. राष्ट्रीय बाजार नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही 2.54 टक्के वाढ घेत 1804.20 वर झेप घेतली.
दरम्यान, गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसात शुक्रवारी कंपनीने 11 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. तोही एक विक्रम बनला होता. कंपनीचे अध्यक्ष मुपेश अंबानी यांनी तेल उद्योगासह दूर संचार क्षेत्रापर्यंत विविध उपक्रमात कार्यरत असणारी ही कंपनी नियोजित वेळेआधीच कर्जमुक्त केल्याची घोषणा केल्यावर तर रिलायन्सच्या शेअरला मोठी मागणी झाली. एका झटक्यातच कंपनीचे बाजारमूल्य 11 लाख कोटींवर गेले.
वर्षात आतापर्यंत 19 टक्के वाढ
रिलायन्सने कोरोना संकट, लॉकडाऊन असतानाही या वर्षात पहिल्या सहा महिन्यात 19 टक्के वाढीचा दर प्राप्त केला आहे. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार शेअर विपणन आणि जगभरातील प्रमुख गुंतवणूकदारांना कंपनीने आंशिक भागिदारी वितरीत केल्याने गेल्या दोन महिन्यात 1.69 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक विविध क्षेत्रात झाली आहे. त्यानंतर कंपनी खऱया अर्थाने कर्जमुक्त झाली. गेल्या वर्षी कंपनीने एक वर्षात कर्जमुक्त होण्याचे वचन भागधारकांना दिले होते. ते वेळेआधीच पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले. तर निधी उभारण्याचे उद्दिष्ट दोन ते अडीच महिन्यात गाठले आहे. यासाठी कंपनीने केवळ एक चतुर्थांश हिस्सेदारीमध्ये जागतिक गुंतवणूकदारांना संधी दिल्याचेही ते म्हणाले. यातून 1.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीमध्ये वाढवली आहे. तर राईट्स इश्युच्या माध्यमातून 53,124.20 कोटी रुपये जमा केले आहेत. या सर्वामुळे कंपनीला तब्बल 19 टक्के अधिक शेअर मूल्य मिळाल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.









