प्रतिनिधी/ सातारा
अनावधानाने रिमांडहोममध्ये प्रवेश मिळाला आणि माझा जिवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. येथील शिस्त, सर्व शिक्षकांची विद्यार्थी प्रिय वागणूक, विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रतिची लागणारी गोडी या सर्वांमुळेच मला आत्तापर्यंतचे यशाचे शिखर गाठता आले आहे. सध्या मी पुणे मेट्रो विभागात टेक्नीशियन इंजिनियर पदावर कार्यरत असून, मी अगदी अभिमानाने सांगतो की, मी रिमांडहोमचा विद्यार्थी आहे. असे विचार सचिन अडागळे यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना सांगितले.
सचिन यांची आई फुलाबाई-वडील मुरलीधर मुळचे उस्मानाबाद येथील, ते ऊस तोड कामगार म्हणून सातारा जिल्हय़ात आपला उर्दनिर्वाह करण्याकरीता आले होते. त्यातच त्यांना चार आपत्य, घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण, राहण्याखाण्याचा खर्च हा नपरवडणारा होता. त्यामुळे त्यांच्या आईने मुलांना रिमांडहोममध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथूनच सचिन यांच्या जिवनाला खरी मोठी कलाटणी मिळाली. इयत्ता 6 वी मध्ये असताना त्यांना रिमांडहोममध्ये प्रवेश मिळाला. त्यांच्याबरोबर ऊस तोड कामगारांची अन्य काही मुले ही दाखल झाली होती. आपल्या दैनंदिन जिवनापेक्षा वेगळे वातावरण असल्याने त्यापैंकी कित्येक मुले तेथ्tढन पळून ही गेली, मात्र सचिन यांनी येथेच राहून शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. चांगल्या वातावरणामुळे हळूहळू सचिनला अभ्यासाची गोडी वाटू लागली. त्यानंतर शिक्षक प्रिय विद्यार्थी म्हणून हे ते गणले जाऊ लागले. काहीवर्षांनंतर त्यांना देवापूर येथील निवासी शाळेत पाठविण्यात आले. तेथे त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले. आता लवकरच नोकरी लागावी अशा उद्देशांनी त्यांनी मुंबई येथे आयटीआयचा दोन वर्षाचा फिटरचा कोर्स केला.
त्यानंतर काही दिवसानंतर इमरसन् नेटर्वक Hee@Jej नवी मुंबई नोकरी सुध्दा लागली, तेथे नोकरी करत असताना तेथील वरीष्ठांनी तू हुशार असल्याचे सांगून पुढील शिक्षण चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नंतर पॉलिटेक्नीकल करण्याचे ठरविले, पण सर्व माहाविद्यालयांमधील फी त्यांना न परवडणारी होती. त्यामुळे सरकारी कोटय़ाअंतर्गत विविध महाविद्यालयात अर्ज केले पण कोठेच त्यांना प्रवेश मिळाला नाही. सचिन यांची चालू असलेली धडपड त्यांची आई पहात होती. त्यादरम्यान त्यांची आई शालेय मध्यान्ह आहार बनविण्याचे काम करत होती, त्यांनी आपल्या मुलाची ही धडपड तेथील एका अनघा कारखानीस शिक्षिकेला सांगितली. त्या शिक्षका सचिन यांना चांगल्या ओळखत असल्याने त्यांनी सातारा येथील गौरी शंकर महाविद्यालयात त्यांच्या प्रवेशाकरीता विनवणी केली, अखेरीस त्यांना प्रवेश मिळाला.
येथे शिक्षण घेत असतानाते कॉलेज सुटल्यावर ऍड. सुभाष नलावडे यांच्याकडे ऑफिस बॉयचे काम करत असत. वृत्तपत्र वितरण आदी त्यांनी कामे केली. त्यातून मिळलेल्या पैशातून शैक्षणिक खर्च पार पाडत असत. पॉलिटेक्नीकलमध्ये ही ते महाविद्यालयात दुसऱया क्रमांकाने उत्तीर्ण झाले. रिमांड होममधील एक विद्यार्थी महाविद्यालयात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले पाहून सर्वांचेच डोळे उंचाविलेले होते. त्यापुढे त्यांनी येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्याचे ठरविले, पण याकरीता नोकरी करणे ही तितकेच गरजेचे होते. कारण त्यांना त्यांच्या आईवडीलांना ही हातभार लावायचा होता. त्यामुळे त्यांनी पुणे येथील पिंपरी-चिंचवड इंजिनियरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणि नोकरी ही केली. यादरम्यान त्यांना स्पर्धात्मक परिक्षांची गोडी लागली. तसेच त्यांनी एमईचे शिक्षण ही पूर्ण केले. स्पर्धात्मक परिक्षेत पहिल्या तीन प्रयत्नात त्यांना अपयश आले, मात्र सन 2019 साली ते परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदावर रूजू झाले. दिल्ली येथे ट्रेनिंग घेऊन प्रारंभी नागपूर मेट्रो आणि सध्या पुणे येथे टेक्नीशियन इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत.
आयटीआयला मुंबई येथे प्रवेश मिळाल्यावर त्यांना वसतीगृहात प्रवेश घेण्याकरीता पैसे नव्हते, त्यामुळे वसतीगृहातील कामे करून तेथे रहात होते. त्यादरम्यान सचिन यांच्या समवेत आणखीन काही विद्यार्थी ही त्यांच्या प्रमाणेच वसतीगृहातील कामे करत तेथे रहात होते. त्यादरम्यान त्यांनी जवळपास एका वेळेस 200ते 250 चपात्या लाटत होते. संपूर्ण शैक्षणिक कार्यकाळात जवळपास ते गुणवत्तेच्या जोरावर 18 वर्षे मोफत असलेल्या विविध अशा वसतीगृहातच राहुन आपले शिक्षण पूर्ण केले.









