प्रतिनिधी / सातारा :
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हा बँकेकडे ईडीने काही माहिती मागितली आहे. त्यादृष्टीने संचालक मंडळ व बँकेच्यावतीने आम्ही वस्तूस्थिती मांडत आहे. आरबीआय आणि नाबार्डच्या निकषाप्रमाणे कारखान्याला कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. हा एक कारखाना नाही. जिल्ह्यातील सहकारी कारखाने आणि दोन खासगी कारखान्यांना जिल्हा बँक कर्ज पुरवठा करते. या सर्व बँकांचा जो कर्ज पुरवठा आहे. तो एकाच धोरणाने केला जातो. जरंडेश्वर कारखान्याबाबत जिल्हा बँकेकडून वेगळे धोरण राबविले गेले नाही, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर कारखान्याला सहभाग कर्ज योजनेअतर्गंत पुणे डीसीसी बँकेबरोबर मुदत कर्जाकरीता रक्कम रूपये 472.85 कोटी मुल्याकंन असलेली स्थावर मालमत्ता रूपये 239.85 कोटी, जंगम रूपये 233 कोटी तारणात जिल्हा मध्यवर्ती बॅकेने घेतलेली आहे. खेळते भांडवलाकरीता सहभाग कर्ज योजनेतर्गंत माल तारण साखर कर्ज रक्कम रूपये 100 कोटी मर्यादा मंजूर असून, कारखाने रक्कम रूपये 30.37 कोटींची उचल केली आहे. आज अखेर येणे बाकी 15.37 कोटी इतकी आहे. कारखान्याने 15 कोटींची परत फेड केलेली आहे.
माल तारण कर्ज मर्यादेच्या अनुषंगाने कारखान्याकडील साखर साठा तारणास्त घेण्यात आलेला आहे. कारखान्यास बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेली एकूण कर्ज मर्यादा रक्कम रूपये 237.60 कोटी असून, एकूण 128.45 कोटी कर्ज वाटप झाले आहे. येणे बाकी रक्कम 97.39 कोटी इतकी आहे. करखान्याने रूपये 31.6 कोटीची परतफेड केलेली आहे. कारखान्याला करण्यात आलेल्या कर्जाची व्याजाची नियमित परत फेड होत असून कारखान्याने मुदती कर्जाची आगाऊ परत फेड केलेली आहे. यामुळे जिल्हा बँकेतील पैसे सुरक्षित आहेत. यामुळे ग्राहकांनी, ठेवीदारांनी चुकीच्या आफवांवर विश्वास ठेवू नये. सातारा जिल्हा बँक सक्षम आहे. कुठलाही चुकीच्या पद्धतीने कर्ज पुरवठा दिला गेला नाही. दिला जाणार नाही. हा मी संचालक मंडळाच्या वतीने मी माझ्या बॅकेच्या हितचितकांना विश्वास देतो.









