कोल्हापूर जिल्हा रिक्षा एकीकरण संघटनेचे आरटीओंना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
रिक्षा व्यवसाय टिकवण्यासाठी सद्याची भाडेवाढ रिक्षा व्यावसायिकांना मान्य आहे. पण काही लोक मिटर फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना दमदाटी करुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजूर केलेली मिटर दरवाढ मंजूर नसल्याचे सांगत नवीन दरवाढीची मागणी करत आहेत. यामुळे नुकसान होत असून रिक्षा मीटर फेरफार करणाऱ्या व्यवसायिकांना सूचना द्याव्यात यासह अन्य मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा रिक्षा एकीकरण संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, 1 मे 2021 रोजी रिक्षाची नवी भाडेवाढ घोषित झाली आहे. सुरुवात 22 रुपयापासून व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपये असे दर जाहीर झाले आहेत. या भाडेवाढीचे सर्व सामान्य रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे. मुळातच कोव्हीड 19 मुळे रिक्षा व्यवसाय मंदीत असल्यामुळे सामान्य रिक्षा व्यावसायिकांना भाडेवाढ ही पहिल्या टप्यासाठी 20 रुपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी वाढीव दराने हवी होती. त्यामुळे पहिल्या किलोमीटरचा प्रवासी नाराज होणार नाही. पण मिटरवाढीचे श्रेय स्वत:ला मिळावे यासाठी काही लोकांकडून मीटर फेरफार करणाऱया व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. प्राधिकरणाने मंजूर केलेली भाडेवाढ मंजूर नसून नवीन दरवाढ आणू पर्यंत मिटर फेरफार करुन देऊ नये यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे तीन महिने दरवाढ मंजूर होऊनसुध्दा फेरफार न झाल्यामुळे रिक्षा चालकांचे नुकसान झाले आहे.
भाडेवाढ मंजूर होऊनसुध्दा फेरफार का करु देत नाहीत याची चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला असता मीटर फेरफार करणाऱया व्यावसायिकांना आरटीओ कार्यालयात बोलावून मीटर फेरफार करण्याची सक्त ताकीद दिली. त्यानुसार नवीन मिटर दरवाढ फेरफार करुन देण्यास सुरुवात झाली. अपवाद वगळता सर्वच रिक्षा संघटनांना सद्याची भाडेवाढ मान्य असून आणखी भाडेवाढ नको आहे. यामुळे फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना पुन्हा एकदा योग्य सूचना देण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, सुभाष शेटे, विजय गायकवाड, मोहन बागडी, ईश्वर चन्नी, शंकरलाल पंडित, शरफुद्दीन शेख, अरुण घोरपडे, विश्वास नांगरे, शिवाजी पाटील, मधुसुदन सावंत उपस्थित होते.