नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केंद सरकारवर कृषी कायदे आणि आंदोलनासंदर्भात टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱयांची क्षमायाचना केली आहे. मात्र या आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱयांची आणि त्यांच्या कुटुंबांची दखल त्यांनी घेतली नाही. या कुटुंबियांना भरपाई आणि त्यांच्यापैकी एकाला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीसंबंधी त्यांनी मौन पाळले आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.
शेतकऱयांच्या प्रश्नांवर काँगेस पक्षाची बाजू त्यांनी मांडली. केंद्र सरकाराने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. तसेच शेतकऱयांचे प्रश्न समजून घेण्याचीही तयारी दर्शविली नाही. त्यामुळे आंदोलन प्रदीर्घ काळ चालले आणि अनेक शेतकऱयांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी घेऊन केंद्राने भरपाई आणि नोकरीची व्यवस्था केली पाहिजे, अशी काँगेसची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









