प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
फळे पिकवण्यासाठी रसायनाचा वापर करणाऱया व अशा प्रकाराची प्रक्रिया करणाऱयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषदेची मंगळवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, वीज वितरण, बीएसएनएल, अन्न व औषध प्रशासन, वजन व मापे विभाग यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हय़ातील ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी ग्राहक परिषद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाल्या, अन्न व औषध विभागाने फळ पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करावी. अशा प्रकारे पिकवलेली फळे तपासणी करून जप्त करावीत. जिल्हय़ात गर्भपाताच्या गोळय़ांच्या व्यापाऱयांवर औषध प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी अशासकीय सदस्यांनी वीज वितरण कंपनीचे फॉल्टी मीटर त्याचप्रमाणे मीटर बसवून न मिळणे, वीज बील भरणा न केल्यास वीज तोडणी करण्यापूर्वी किमान आठ दिवस आधी ग्राहकास नोटीस देणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण लवकर करणे, आठवडा बाजारांमध्ये विक्री होणाऱया बेकरी उत्पादनांची तपासणी करणे, त्यांचा परवाना तपासणे. तसेच वजन व मापे विभागाने आठवडा बाजारांमधील विपेत्यांकडील वजनांची तपासणी करावी. तहसीलदार कार्यालयांमध्ये अशासकीय सदस्यांची यादी लावावी. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करणे, योजनांची प्रसिद्धी करणे आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले.
वीज वितरण कंपनीचे मीटर तसेच वायर तुटणे, पोल खराब होणे याविषयी सदस्य नकुल पार्सेकर, सुभाष गोवेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी वीज वितरण कंपनीस दिले. सदस्य राजेश नवांगुळ यांनी गर्भपातांच्या गोळय़ा जिल्हय़ात सर्रास विक्री होत असल्याचे सांगून यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.
या परिषदेमध्ये अशासकीय सदस्य सर्वश्री नकुल पार्सेकर, सुभाष गोवेकर, सुरेश पाटील, अरुणानंद लाड, जयराम राऊळ, विलास कुबल, राजेश नवांगुळ, सुभाष बांबुळकर या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. आभार नायब तहसीलदार गवस यांनी मानले.









