वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंदामध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाच्या राष्ट्रीय सराव शिबिराला फेरप्रारंभ झाला असून या शिबिरात हॉकीपटूंकडून कसून सराव करवून घेतला जाईल, असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांनी सांगितले.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास घडविला. ऑलिंपिक स्पर्धेवेळी भारतीय हॉकीपटूंना कोरोना संदर्भातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील यशानंतर भारतीय हॉकी संघाला काही दिवस विश्रांती देण्यात आली होती. सोमवारी भारतीय हॉकीपटूंनी या सराव शिबिराला पुन्हा नव्या जोमाने प्रारंभ केला. येथील साईच्या केंद्रामध्ये हॉकीपटूंकरिता कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. खेळाडूंची शारीरिक तंदुरूस्ती सुधारण्यावर या शिबिरात भर दिला जाईल, येत्या डिसेंबर महिन्यात ढाका येथे होणाऱया आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच पुढीलवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा आणि 2022 च्या सप्टेंबरमधील चीन येथे आशियाई क्रीडास्पर्धा भरविली जाणार आहे.









