वृत्तसंस्था/ पतियाळा
भारताची महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने शुक्रवारी ऍथलेटिक्स फेडरेशन चषक स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळविली. तिने 65.06 मी. थाळीफेक करण्याचा नवा विक्रम नोंदवला. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 63.5 मीटर्सची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
कमलप्रीतने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना आधीचा 64.76 मी.चा कृष्णा पुनियाने नोंदवलेला विक्रम मागे टाकला. पुनियाने 2012 मध्ये हा विक्रम केला होता. याशिवाय थाळीफेकमध्ये 65 मीटर्स अंतर भारतीय महिलांनी पहिल्यांदाच पार करण्यात यश मिळविले आहे. ‘नव्या राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिक पात्रता मिळविणाऱया कमलप्रीतचे खूप खूप अभिनंदन! ऑलिम्पिक पात्रतेसाठी ठेवण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा तिने जास्त अंतर नोंदवत हे यश मिळविले आहे,’ असे भारतीय क्रीडा प्राधिकरणने ट्विट केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशननेही तिच्या विक्रमाची दखल घेत ट्विट केले आहे.









