प्रफुल्ल पटेल यांचा ठाम विश्वास, समविचारी पक्षांशी युतीची तयारी काँग्रेस
प्रतिनिधी/ पणजी
शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे ज्या प्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी निर्माण करून महाराष्ट्रात भाजपला पर्यायी सरकार दिले, त्याच धर्तीवर गोव्यातही एनसीपीच्या पुढाकाराने भाजपला पर्यायी सरकार देऊ शकतो, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. येत्या निवडणुकीत भाजपचा पाडाव करणे हेच एकमेव धोरण असून त्याच समविचाराने निवडणूक लढविणाऱया कोणत्याही पक्षाशी युती करण्यास आम्ही तयार असणार, मात्र काँग्रेस आणि आप यांच्याशी कधीच युती करणार नाही, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार चर्चिल आलेमाव, अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, गोवा प्रदेश महिला शाखेच्या सरचिटणीस नेली रॉड्रिगिश तसेच महिला प्रमुख सेंड्रा मार्टीन, अविनाश भोसले, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजप सरकारला लोक कंटाळले
राज्यातील विद्यमान सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. अर्थव्यवस्था लयास गेली आहे. पर्यटन उद्योग संपल्यात जमा झाला आहे. विकासकामांसाठी सरकारकडे निधीची ददात आहे, पर्रीकरांच्या आजारपणात वर्षभर गोव्याला नेतृत्त्वच नव्हते. ते वर्ष पूर्ण वाया गेले आहे, असे एकूण चित्र असल्यामुळे भाजपच्या राजवटीस लोक कंटाळले आहेत. याच संधीचा फायदा येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांना उठविता येणार आहे, असे पटेल यावेळी म्हणाले.
गोव्यात लवकरच प्रभारीची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात पक्षबांधणीचे काम प्रभावीपणे हाती घेतले आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीपर्यंत लोकसंपर्काचे कार्य अधिक जोमाने पुढे नेणार आहे. त्याचाच भाग म्हणून लवकरच गोव्याच्या प्रभारीपदी महाराष्ट्रातील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, तसेच पणजी, वास्को, बाणावली आदी ठिकाणी नूतन कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसने विश्वासघात करुन दिली भाजपला संधी
1999 पासून राष्ट्रवादी गोव्याच्या राजकारणात आहे. एकेकाळी आमचे चार आमदार होते. त्यातील तिघे मंत्री होते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसलाच सत्ता स्थापन करण्याची संधी होती. स्वबळावर निवडणूक लढवूनही त्यांचे 17 आमदार विजयी झाले होते. निवडणुकी आधी आणि निकालानंतरही आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यात गोवा फॉरवर्डचे तीन आणि राष्ट्रवादीचा 1 मिळून 21 चे संख्याबळ सहज शक्य होते. परंतु काँग्रेसने ऐनवेळी माघार घेत स्वतःच्या नाकर्तेपणातून ती संधी गमावली, काँग्रेसने आमचाही विश्वासघात केला आणि भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली, असा आरोप त्यांनी केला.
दैनावस्थेतील काँग्रेसवर कोण विश्वास ठेवणार?
नंतरच्या काळात तर काँग्रेसला आपले आमदारही सांभाळणे जमले नाही. त्यातून तब्बल एक डझन आमदारांनी भाजपला जवळ केली आणि काँग्रेसची दैनावस्था करून टाकली. अशी काँग्रेस आता पुन्हा स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा बोलत आहे. अशा पार्टीवर मतदार किती आणि कसा विश्वास ठेवणार, असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातही काँग्रेसची अशीच गत असून केवळ 44 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे 56 आहेत, असे ते म्हणाले.
चर्चिल आलेमाव भाजपचे विरोधकच : पटेल
आम्ही सदैव भाजपचे विरोधकच आहोत. तीच भूमिका चर्चिल आलेमाव यांचीही असून त्यांनी कधीच सरकारला थेट समर्थन दिलेले नाही. मात्र एक आमदार या नात्याने मतदारसंघाचा विकास आणि मतदार, कार्यकर्त्यांची कामे करून घेण्यासाठी परिस्थितीनुसार त्यांना सरकारसोबत राहावे लागते, असा खुलासा पटेल यांनी एका प्रश्नावर केला.
काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात
काँग्रेस स्वबळावर भाजपला हरवू शकत नाही हे आता उघड सत्य असल्यामुळेच अनेक विद्यमान आमदार, अन्य बडे नेते, कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. त्यावर अवश्य विचार होईल. मात्र किती जागा लढवायच्या तो निर्णय तत्कालीन परिस्थितीनुसार घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
गोव्याला कोळसा हब बनविणे खपवून घेणार नाही
कोळशामुळे गोव्यातील पर्यावरण पर्यटन नष्ट होणार आहे. त्यामुळे गोव्याची जैवविविधता नष्ट करून कोणा एकाच्या फायद्यासाठी गोव्याला कोळसा हब बनविणे आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
कृषी विधेयकाला मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली घाई अनाकलनीय आहे. त्यावर खुली चर्चा करून, लोकांची मते, सूचना जाणून घेऊन पुढील अधिवेशनात मान्यता देता आली असती, असे मत व्यक्त करून त्यासाठीच आम्ही या विधेयकाला विरोध दर्शविला आहे, असे ते म्हणाले.
म्हादईसाठी वाळपईतील लोक गप्प का? चर्चिल म्हादईचे रक्षण करण्यात गोव्याचे तीन खासदार कमी पडले. कर्नाटकातील खासदारांच्या दबावास केंद्र सरकार बळी पडले, असे मत चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले. म्हादईचे पाणी वळविण्यास आमचा सदैव विरोध आहे. खरे तर या विषयावर वाळपईतील लोकांनी सर्वप्रथम आवाज उठवायला हवा होता. कारण त्यांनाच याची सर्वाधिक बाधा पोहोचणार आहे. परंतु ते गप्प का आहेत, हे एक कोडेच आहे, असेही ते आलेमाव म्हणाले.









