लढाऊ जेट विमानातून 30 मिनिटांचे उड्डाण : सह-पायलट बनण्याचा बहुमान
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर हवाई तळावरून सुखोई 30 एमकेआय फायटर जेटमधून 30 मिनिटे उड्डाण केले. सुखोई जेटने सकाळी 11.08 वाजता उड्डाण केल्यानंतर 11.38 ला माघारी परतले. सुखोईमध्ये उड्डाण करणाऱ्या मुर्मू ह्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यांच्या आधी माजी राष्ट्रपती प्रतिभासिंह पाटील यांनीही सुखोई उड्डाण केले होते.
सध्या आसाम दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी तेजपूर येथील तळावरून सुखोई या फायटर जेटमधून झेप घेत अभिमानास्पद क्षण अनुभवला. सुखोईमध्ये स्वार होण्यापूर्वी त्यांना लढाऊ विमानाची परिपूर्ण माहिती देण्यात आली. हे उड्डाण करण्यासाठी राष्ट्रपती हवाई दलातील अधिकाऱ्यांसह फ्लाइंग सूटमध्ये येथे दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासाठी सज्ज असलेले लढाऊ विमान 106 स्क्वाड्रन कमांडिंग ऑफिसर ग्रुप पॅप्टन नवीन कुमार यांनी उडवले. तत्पूर्वी तेजपूर येथील हवाई तळावर भारतातील तिन्ही सेनादलांच्या प्रमुख या नात्याने त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. तसेच सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली.

अरूणाचल प्रदेशवरून भारत आणि चीनमध्ये सध्या वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण करत राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतातर्फे शत्रूराष्ट्राला कडक संदेश दिला. तेजपूर एअरफोर्स बेस चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतान या चार देशांपासून भारताचे संरक्षण करतो. त्यामुळे त्यांच्या सुखोई उड्डाणासाठी या हवाई तळाची मुद्दामहून निवड करण्यात आली होती. सुखोई उड्डाणाच्या माध्यमातून तिन्ही सैन्यदलांच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने राष्ट्रपतींनी सैन्याची शक्ती, शस्त्रे आणि धोरणांची माहितीही घेतली.
प्रतिभाताई पाटील यांच्या नावे दोन विक्रम
मुर्मू यांच्या आधी 2009 मध्ये देशाच्या 12व्या राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी सुखोईमध्ये उड्डाण केले होते. प्रतिभा पाटील यांनी सुखोईमधून भरारी घेत दोन विश्वविक्रम नोंदवले होते. सुखोई उडवणाऱ्या कोणत्याही देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळविण्याबरोबरच कोणत्याही देशातील सर्वात वृद्ध महिला होण्याचा मानही त्यांनी संपादन केलेला आहे. या उड्डाणावेळी प्रतिभा पाटील 74 वर्षांच्या होत्या. त्याचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले आहे.
प्रतिभा पाटील यांच्या आधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना 8 जून 2006 रोजी सुखोई उडवले होते. असे करणारे ते देशाचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्यापाठोपाठ प्रतिभाताई पाटील यांनीही सुखोईमधून झेप घेतली होती. तर, आता द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी संररक्षणमंत्री असताना 17 जानेवारी 2018 रोजी सुखोई 30एमकेआयमधून उड्डाण केले होते.
सुखोई 30 एमकेआय लढाऊ विमान
सुखोई 30 एमकेआय या लढाऊ विमानात एका मिनिटांत 57 हजार फूट उंचीपर्यंत उ•ाण भरण्याची क्षमता आहे. यात 30एमएमची एक ग्रिजेव-शिपुनोव ऑटोपॅनन असून त्याद्वारे एका मिनिटात 150 राउंड फायर केले जाऊ शकते. या लढाऊ विमानाच्या हार्डपॉईंटमध्ये शस्त्रे ठेवण्याची अधिक सुविधा असल्यामुळे यात 14 शस्त्रे साठवली जाऊ शकतात. त्यात ब्रह्मोस मिसाईलचाही समावेश असू शकतो. ताशी 1,220 किमी वेगाने उडण्याची क्षमता या लढाऊ विमानात आहे.
राष्ट्रपतींचा तीन दिवसांचा आसाम दौरा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या आसाम दौऱ्यासाठी गुरूवारी दुपारी गुवाहाटीमध्ये पोहोचल्या होत्या. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल गुलाबचंद कटारिया हेही विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसात त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देत जीप सफारीचा आनंद लुटला. तसेच दोन दिवसीय ‘गज महोत्सवा’चे उद्घाटनही केले. तसेच हवाई दलाच्या कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली होती.









