रत्नागिरी जिल्हय़ातील वादळग्रस्त भागातील नागरिकांना उभारी देण्याचे काम
अजय कांडर / कणकवली:
राष्ट्र सेवा दलाने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात वेगळे काम केले होते. वेळोवेळी आपत्तीग्रस्तांना मदत केलीच परंतु त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कणखरही बनविले. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना अशीच मदत करून संवादही साधला असताना आता कोकणच्या विविध भागात निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतकार्य उभारून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांचेही पाठबळ लाभत आहे.
कोकणात वादळामुळे सिंधुदुर्गात जेवढे नुकसान झाले, त्याच्या अनेकपटीत रत्नागिरी, रायगड भागात नुकसान झाल्याने सध्या त्या भागात राष्ट्र सेवादलाने मदतीचे कार्य सुरू केले असल्याचे राष्ट्र सेवा दलाच्या शरद कदम यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्हय़ाच्या काही भागात राजन इंदूलकर, प्रा. ज्ञानेश्वर गाथाडे, अभिजीत हेगशेटय़े, विवेक घारपुरे, विकास घारपुरे, सदाशिव मगदूम आदी कार्यकर्ते मदत कार्य उभारत आहेत. यात निसर्ग वादळाने उद्ध्वस्त केलेल्या कोकण किनारपट्टीवरील आड, उटंबर, नवानगर या भागात राष्ट्र सेवादलाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आणि येथील उद्ध्वस्त बागायती परिसर याची साफसफाई आणि स्वच्छता करण्यासाठी राष्ट्र सेवादलाचे सानेगुरुजी सेवा पथक (15 जणांचे) राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक सदग्नाशिव मगदूम यांच्या नेतृत्वाखाली येथे कार्यरत झाले आहे. सांगली, कोल्हापूर येथे गेल्या वषी आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये राष्ट्र सेवादलाच्या या सेवा पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. पुढील महिना-दोन महिने आवश्यकतेनुसार येथे श्रमदानासाठी अनेक तरुण सहभागी होणार आहेत, त्याचे नियोजन विकास घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीत कोकणवासियांच्या मदतीसाठी राष्ट्र सेवादल मदत करत आहे, त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या घरासाठी-ताडपत्री, छतासाठी प्लास्टिक कापड, मेणबत्त्या, काडेपेटी, मास्क असे किट देण्यात येत आहेत. सेवा पथकाद्वारे हे वाटप करण्यात येत असून या सेवापथकात मिरजेतून सदाशिव मगदूम, शोभा मगदूम, कोमल मगदूम, मिलिंद कांबळे, पृथ्वीराज सातपुते, अक्षय सुके व इचलकरंजीतून हरिकृष्ण अडकिल्ला, रोहित दळवी, दिगंबर मतिवडे व गौरी कोळेकर सहभागी झाले आहेत. काही भागात राजन इंदूलकर, ज्ञानेश्वर गाथाडे, अभिजीत हेगशेटय़े, विवेक घारपुरे, विकास घारपुरे, सदाशिव मगदूम यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
यानिमित्ताने कोकणच्या वादळी परिसरातील सध्याचे भीषण प्रश्न आणि गरजा लोकांनी व्यक्त केल्या. शासनाची मदत येताना, त्यात भेदभाव होतात, काही ठिकाणी पोहोचते, तर काही ठिकाणी नाही. रॉकेल 5 लीटर जाहीर असताना काही भागात फक्त 1 लीटर मिळाल्याची खंत व्यक्त होते. वीज नाही. पडलेले खांब उभारण्यासाठी एमएसईबीकडे यंत्रणा नाही. वादळी भरतीने विहिरीत खाडीचे पाणी घुसले ते पिण्यासाठी अयोग्य झाले. लाईट नाही. त्यामुळे पंप बंद आहेत. घरावरील पत्रे, नळे उडाल्याने घरांना पावसात घर झाकण्यासाठी पत्रे पाहिजेत. शासनाकडून एकही पत्रा पोहोचला नाही. काही संस्थांनी पाठविले मात्र ते काही मच्छीमार आणि काही गरिबांच्या घरापर्यंत पोहोचले नाहीत. दरम्यान, अशा नुकसान परिस्थितीत कोकण कृषी विद्यापिठाने यात महत्वाची संशोधन पातळीवर भूमिका घेणे महत्वाचे आहे. वादळात कोसळलेल्या माड वृक्षांच्या लाकडाचे काय करायचे, त्याचा उपयोग आर्टिस्टिक फर्निचरसाठी करता येईल का? याचे संशोधन करणे आवश्यक असल्याची मागणी राष्ट्र सेवादलातर्फे करण्यात येत आहे.
युवकांशी संवाद
राष्ट्र सेवादल नेहमीच मदत कार्यात पुढे असते. अशावेळी त्या-त्या भागातील तरुणांशी संवादही साधत असते. याच पार्श्वभूमीवर या मदत कार्यावेळी अभिजीत हेगशेटय़े, राजन इंदूलकर यांनी तरुणांशी संवाद साधला. राष्ट्र सेवादलाचे कार्य साने गुरुजींच्या विचाराने चालते. आज कोविड 19 मुळे गावातील आपल्या भोवतालच्या नैसर्गिक संपत्तीचे आणि त्याच्या निर्माण क्षमतेचे महत्व जाणून घेतले पाहिजे. युवकांना आज मुंबईचे आकर्षण आहे. महाराष्ट्र आणि जगभरातल्या लोकांना कोकणातील विलोभनीय निसर्ग आणि समुद्र किनाऱयाचे आकर्षण आहे. पारंपरिक रोजगारीच्या वैचारिक चौकटीच्या बाहेर पडून याचा वेगळा विचार तुम्ही करण्याची गरज असून यातूनच रोजगार निर्माण होईल आणि संकट हीच नव्या प्रगतीची संधी म्हणत त्यावर स्वार होऊ या. डॉ. गणेश देवी यांच्या संकल्पनेतील रिस्किलींग सेंटर सुरू करू या!









