भाजपकडून बैठकीसाठी मित्रपक्षांना आमंत्रण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकीकडे भाजपविरोधात विरोधी पक्ष मोट बांधत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिक बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजपने आपल्या मित्रपक्षांना मंगळवारी दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले असून जुन्या सहकाऱ्यांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व्यापक रणनीती आखली आहे. मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. देशातील विकासाची गती वाढविण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन या बैठकीमध्ये मित्रपक्षांना वरिष्ठांकडून केले जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांमध्ये आघाडी सोडून बाहेर पडलेल्या राजकीय पक्षांना पुन्हा आघाडीत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम पक्ष, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि इतर पक्षांनी पुन्हा रालोआचा भाग व्हावे, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. लोकजनशक्ती पक्ष आणि हिंदुस्थानी अवाम पक्षाला भाजपकडून लेखी आमंत्रण देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हे आमंत्रण पाठविले असून रालोआत समाविष्ट व्हा अशी विनंती केली आहे. हे दोन्ही पक्ष 18 जुलैला रालोआच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच बिहारमधील छोट्या पक्षांना रालोआचे सदस्य पक्ष बनविण्यावर भर देण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी विकसशील इन्सान पक्षाचे नेते मुकेश साहनी यांची भाजपच्या नेत्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. हा पक्षही रालोआत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
भाजपाध्यक्षांकडून आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसीत देश बनविण्याचा निर्धार केला असून रालोआच्या सर्व जुन्या मित्रांनी या विकासगंगेत सहभागी व्हावे आणि आपले योगदान द्यावे असे आवाहन भाजपने केले आहे. देशाची आर्थिक प्रगती, देशाची सुरक्षा व्यवस्था, गरिबांचे कल्याण, देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे पुनरुत्थान, भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान इत्यादी बाबींवर पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार काम करीत आहे. मित्रपक्षांनी रालोआत सहभागी होऊन सरकारला अधिक बळ द्यावे, असे आवाहनही जे. पी. नड्डा यांनी केले आहे.









