प्रतिनिधी / बेळगाव
छोटय़ा पडद्यावर लोकप्रियतेचा इतिहास रचलेल्या रामायण आणि महाभारत मालिकांच्या पुनरागमनाने प्रेक्षकांना जुन्या काळात रमविले आहे. काही वर्षे उपेक्षित राहिलेले दिल्ली दूरदर्शन पुन्हा प्रेक्षकांच्या चर्चेत आले असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या लॉकडाऊननंतर घरी राहणाऱया प्रेक्षकांसाठी या मालिका दैनंदिन स्वरुपात भेटीसाठी येऊ लागल्या आहेत.
पूर्वी दूरदर्शन या नावाने ओळखल्या जाणाऱया आणि आता डीडी नॅशनल नावाने सुरू असलेल्या चॅनलने आपल्या गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिकांचे पुनर्प्रसारण शनिवारपासून सुरू केले आहे. पूर्वी इतकी अफाट नसली तरी जुन्या पिढीच्या मंडळींसाठी या मालिकांची लोकप्रियता अबाधित आहे. त्यामुळे निवडक प्रेक्षकवर्ग या मालिकांकडे नक्कीच वळू लागला आहे. रामानंद सागर यांची रामायण आणि बी. आर. चोप्रा यांची महाभारत अशा दोन मालिकांचे पुनर्प्रसारण घरी बसणाऱया प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन आले आहे.
1980 च्या सरत्या दशकात आणि फक्त दूरदर्शन हे मनोरंजनाचे एकमेव चॅनल असताना रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांनी रसिकांची मने जिंकली होती. रविवारच्या सुटीच्या दिवशीचा मनोरंजनाचा एक अमूल्य ठेवा अशीच या मालिकांची ओळख बनली होती. आबालवृद्ध साऱयांनी घरामध्ये ठरावीक वेळी एकत्रित येऊन या मालिकेचा आनंद घेण्याचा सोहळा या माध्यमातून साजरा होत असे. आता त्या सुवर्णकाळाची पुन्हा आठवण करून देणारी पर्वणी या आपत्तीच्या वेळी उपलब्ध झाली आहे. ही बाब दिलासादायक ठरली आहे.
रविवारची सकाळ ही रामायण आणि महाभारतच्या प्रेक्षकांसाठी खास ठरायची. सकाळच्या वेळी इतर सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेवून नागरिक याच एकमेव कार्यामध्ये गुंतत होते. टीव्ही संचदेखील घरोघरी नसल्यामुळे कुणाच्या तरी घरामध्ये मोठी गर्दी करून या मालिकांचा आनंद लुटण्याची मौज एका पिढीने अनुभवली आहे. आताच्या भरमसाट चॅनल्सच्या गर्दीत मालिका विस्मृतीत जाण्यासही वेळ लागत नसताना या दोन्ही मालिकांनी एका प्रेक्षकांचे दैनंदिन व्यवहारचक्रच बदलून टाकले होते. त्याची पुनःश्च अनुभूती घेण्याची संधी या मालिकांनी दिली आहे.

अशी आहे मालिका प्रसारणाची वेळ
रामायण मालिका- दररोज सकाळी 9 वाजता. त्यापुढील भाग रात्री 9 वाजता. (ही मालिका डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे. याचा सेटटॉप बॉक्सवरील क्रमांक 123 आहे.)
महाभारत मालिका- दररोज दुपारी 12 वाजता. त्यापुढील भाग रात्री 9 वाजता. (ही मालिका डीडी भारती या चॅनलवर पाहता येणार आहे. याचा सेटटॉप बॉक्सवरील क्रमांक 133 आहे.)









