रजतशीलेची स्थापना करून पंतप्रधान मोदींनी केले भव्य राममंदिराचे भूमीपूजन
अयोध्या / वृत्तसंस्था
उपस्थित मान्यवरांच्या कंठांमधून उत्स्फूर्ततेने निघणारा रामजयजयकाराचा स्वरनिनाद अन् देशभरातील दशकोटय़वधी रामभक्तांचे दूरचित्रवाणी संचांवर खिळलेले डोळे अशा अद्भूत आणि भावोत्कट वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामजन्मभूमीस्थानी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंद या शुभमुहूर्तावर त्यांनी राममंदिराची प्रथम रजतशीला (चांदीची वीट) स्थापन करून मंदिरनिर्माण कार्याचा प्रारंभ केला. यावेळी अयोध्यानगरीत तर उत्साह ओसंडून वाहत होताच, पण साऱया देशाच्या कानाकोपऱयात आनंदोत्कट जल्लोष करण्यात येत होता. इतर देशांमध्येही असंख्यांनी या कार्यक्रमाचे अवलोकन केले.
‘शतकानुशतकांची प्रतीक्षा आज संपली आहे. रामजन्मभूमी आज खऱया अर्थाने मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलल्लाला एका अस्थायी मंदिरात वास्तव्य करावे लागले होते. मात्र यापुढच्या काही काळातच प्रभू रामचंद्र एका भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. हे राममंदिर एकात्म भारताचे देदिप्यमान प्रतीक म्हणून प्रसिद्धीस येणार आहे, अशा ह़दयस्पर्शी शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भूमीपूजन कार्यक्रमानंतरच्या भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुटसुटीत, शिस्तबद्ध कार्यक्रम
अचूक मुहूर्तावर सुरू झालेला हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध रितीने आयोजित करण्यात आला. भूमीपूजनाआधी मोदींनी रामजन्मभूमीपासून जवळच असणाऱया हनुमानगढी येथे प्रभू हनुमंताचे दर्शन घेऊन तेथेही पूजाअर्चा केली. नंतर रामजन्मभूमीस्थळी येऊन साष्टांग नमस्कार केला. सध्या रामलल्लाची मूती एका अस्थायी मंदिरात ठेवण्यात आली आहे. तेथे त्यांनी पूजा व आरती केली. नंतर भूमीपूजन स्थळा, जेथे भूमी खोदून मंदिराच्या पायासाठी खड्डा करण्यात आला होता, तेथे त्यांनी पुरोहितांनी केलेल्या मंत्राघोषात जन्मभूमीची पूजा केली. आणि पूर्वनिर्धारित मुहूर्तावर रजतशीला (चांदीची वीट) स्थानापन्न केली. अशा पाच शीला त्यांनी ठेवल्या. अशा प्रकारे भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मोदींनी पांढऱया रंगाचा वेश आणि भगवे उपरणे अशी वेषभूषा केली होती.
नियमांचे यथायोग्य पालन
साऱया कार्यक्रमात सामाजिक अंतराच्या नियमांचे योग्य पालन करण्यात आले. 175 मान्यवरांना निमंत्रण होते. त्यातील बव्हंशी उपस्थित राहिले. एकमेकांपासून सुयोग्य अंतरावर त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रामजन्मभूमी आंदोलनाचे अध्वर्यू महंत नृत्यगोपालदास आणि सरसंघचालक मोहन भागवत, भाजपनेत्या उमा भारती इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्याची परिस्थिती पाहता केवळ निवडक व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आले आहे असे सांगण्यात आले.
देशभर जल्लोष, फटाके
ज्यावेळी अयोध्यानगरीत हा आनंदोत्सव साजरा होत होता, त्याच वेळी साऱया देशात असंख्य ठिकाणी फटाके लावून तरूणाईकडून जल्लोष करण्यात आला. देशभरातील राममंदिरांमध्ये तसेच इतर मंदिरांमध्येही पूजाआर्चा, भजन, रामनामस्मरण, रामचरितमानस या गोस्वामी तुलसीदासरचित ग्रंथाचे पठण, हनुमानचालिसा पठण इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी मिठाई वाटून आणि चुरमुरे उधळूनही आनंद व्यक्त केला. सर्वांच्या मनात असलेला स्वप्नपूर्तीचा आनंद अशा प्रकारे व्यक्त होत होता.
अयोध्येत सांस्कृतिक कार्यक्रम
भूमीपूजन व मान्यवरांची भाषणे हा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतरही जन्मभूमीस्थळी अनेक तास सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. शीख गायकाने तन्मयतेने गायलेली रामभजने हा उपस्थितांच्या आकर्षणाचा बिंदू ठरला. काही वेळ पंतप्रधान मोदी यांनी इतर उपस्थित मान्यवरांनीही हे कार्यक्रम पाहिले.
राम हे वैश्विक एकात्मतेचे प्रतीक
प्रभू रामचंद्र हे केवळ भारताच्याच नव्हे, तर वैश्विक एकात्मतेचे प्रतीक आहे. भारतात प्रत्येक भाषांमध्ये रामायणे आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात तर राम पवित्र देवता म्हणून मानले जातातच पण जगातील इतर अनेक देशांमध्येही त्यांना देवत्वाचे स्थान मिळाले आहे. इंडोनेशिया या मुस्लीम देशातही अनेक रामायणे असून ती आजही लोकप्रिय आहेत. श्रीलंकेत ‘जानकी हरण’ या नावाने रामायण आहे. नेपाळमध्ये माता जानकीला मानले जाते. कंबोडिया, लाओस, थायलंड, मलेशिया इत्यादी देशांमध्येही त्यांची त्यांची रामायणे लोकप्रिय आहेत, याचा आवर्जून उल्लेख पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात केला.
राममंदिर निर्माण हे राष्ट्रनिर्माण…
अयोध्येतील रामाचे भव्य मंदिर हे सार्वज्न्ननिक हिताचे कार्य आहे. जसे राष्ट्रनिर्मितीचे कार्य प्रत्येक नागरीकासाठी महान असते, तसेच हे कार्यही आहे, असे उद्गार ज्येष्ठ महंत नृत्यगोपालदास यांनी काढले. रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाचा हा देशाच्या आनंदयुगाचा प्रारंभ आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य…
पंतप्रधान नरेंद मोदी यांची दूरदृष्टी आणि प्रयत्न यामुळेच रामजन्मभूमीचे प्रकरण शांततापूर्ण मार्गाने या टप्प्यापर्यंत पोहचले आहे. याच दिवसासाठी हिंदूंनी पिढय़ानपिढय़ा गेल्या 500 वर्षांहून अधिक काळ आंदोलन चालविले होते. अनेकांनी यासाठी आत्मबलिदान दिले. या असीम त्यागाचे सार्थक झाले आहे, अशा शब्दांमध्ये यागी आदित्यनाथ यांनी त्यांचे विचार मांडले.
अयोध्येत जणू अवतरला रामायणकाळ
‘जय श्रीराम‘ असा अखंड घोष, सहस्रावधींनी केलेला शंखनाद, सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा, फटाके, ढोल-ताशेवादन अशा थाटात अयोध्येतील स्थानिकांनी भूमीपूजनाचा प्रसंग साजरा केला. आज आम्हाला जणू रामायण काळात गेल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनीं व्यक्त केली. या आनंद सोहळय़ात विविध धर्मांच्या लोकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हा हिंदुत्वाचा धर्मनिरपेक्षतेवर विजय
पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राममंदिराचे भूमीपूजन करणे हा हिंदुत्वाचा धर्मनिरपेक्षतेवरील विजय आहे, अशी प्रतिक्रिया कोणत्या हिंदुत्ववादी नेत्याने नव्हे, तर मुस्लीम नेते असदुद्दिन ओवैसी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी राममंदिराच्या पायाबरोबरच हिंदूराष्ट्राचाही पाया घातला आहे, असे ते म्हणाले.
राम हे साऱयांचेच
प्रभू रामचंद्र हे साऱया जनतेचे आहेत. त्यांचे मंदिर आता होत आहे ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया काँगेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. पंजाब व राजस्थान या राज्यांमधील काँगेस मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमासाठी जनतेचे अभिनंदन करत आंनद व्यक्त केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
ड भाषणाचा प्रारंभ ‘जय सिया राम’ या लोकप्रिय वाक्याने. भव्य राममंदिराचे निर्माण आता त्वरित होणार
ड या मंदिरासाठी असंख्यांनी असीम त्याग केला. त्या सर्वांचे मी आभार मानून त्यांना वंदन करतो
ड प्रभू रामचंद्रांचे अस्तित्वच नाकारण्याचा प्रयत्न झाला. पण राम आमच्या संर्वांच्या ह़दयातच स्थानापन्न
ड आपण जितके अधिक सामर्थ्यसंपन्न होऊ तितके शांततावादी होवू हाच प्रभू रामचंद्रांचा संदेश
ड सामाजिक एकात्मता हाच रामचंद्रांच्या राज्यपद्धतीचा पाया होता. त्याचे अनुकरण आपण करू
ड राममंदिराच्या निर्माणामुळे अयोध्या व परिसराचा झपाटय़ाने आर्थिक विकास होण्याची निश्चिती
ड परस्पर बंधूभाव आणि प्रेम यांच्या माध्यमातून आपण सारेजण राममंदिराच्या शीला एकमेकींना जोडू