20 तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे दागिने लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर परिसरातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. मंगळवारी रात्री चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून बुधवारी यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मंजुनाथ गुरुसिद्धय्या चिक्कमठ यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी मंजुनाथ व त्यांचे कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून घटप्रभेला गेले होते. मंगळवारी रात्री ते घरी परतले. त्यावेळी दर्शनी आणि मागील असे दोन्ही दरवाजे उघडे होते. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. कपाट व इतर ठिकाणी किमती ऐवजासाठी शोधाशोध करण्यात आली आहे. चोरटय़ांनी 20 तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला आहे.
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना काही ठशांचे नमुने मिळाले असून त्यावरून चोरटय़ांचा शोध घेण्यात येत आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
बॉक्स
कॉलेजमध्येही चोरी नेहरुनगर परिसरातील एस. एस. एस. समितीच्या महावीर पी. मिरजी वाणिज्य महाविद्यालयात चोरीची घटना घडली आहे. यासंबंधी प्राचार्या निर्मला गडाद यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून जमा झालेली 2 लाख 82 हजार 500 रुपये रोकड चोरटय़ांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे.









