प्रतिनिधी/ मुंबई
प्रखर हिंदुत्वावादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यावरून देशात राजकारण पेटलेले असतानाच आता हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी समोर आली आहे. कडवे हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात ही मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीची महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करून तोगडियांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात गेली अनेक वर्षे धगधगणाऱया अयोध्येतील राम मंदिराच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. त्यातून अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग अखेर मोकळा झाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजाणी करणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारण्यासाठीच्या ट्रस्टची लोकसभेत घोषणा केली. त्यामुळे राम मंदिराच्या आंदोलनाचा पाया रचणाऱया आणि त्याचे नेतफत्व करणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली. तोगडिया यांच्या या मागणीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरूनच काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध आहे.









