ट्रस्टच्या खात्यात पोहोचले 1000 कोटी
वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर निर्माण होणाऱया मंदिराच्या पायासाठी 15 फुटांपर्यत खोदकाम करण्यात आले आहे. तर मंदिर उभारणीसाठी निधी संकल्प संग्रह अभियानच्या अंतर्गत 15 जानेवारीपासून आतापर्यंत 27 दिवसांमध्ये सुमारे 1000 कोटी रुपयांचे धनादेश ट्रस्टच्या खात्यात जमा करविण्यात आले आहेत. तर रोख निधी जमा करणाऱया 37 हजार कार्यकर्त्यांकडेही मोठय़ा प्रमाणात धनादेश आहेत. बँकांच्या मुख्य कार्यालयामध्ये हे धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
याचदरम्यान मंदिरासाठी निधीसंकलन करण्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विधानामुळे वाद उभा ठाकला आहे. अखिलेश यांनी राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱयांना ‘चंदाजीवी’ संबोधिले होते. भगवान रामाने अखिलेश यांना सद्बुद्धी द्यावी, भगवान रामावर श्रद्धा ठेवणारे सर्वजण मंदिरासाठी आर्थिक सहकार्य करत आहेत. यासंबंधी समाजाच्या कुठल्याही घटकात मतभेद नसल्याचे उद्गार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काढले आहेत.
40 फूट खोल असणार पाया मंदिराचा पाया 40 फूट खोल राहणार असल्याची माहिती राय यांनी दिली आहे. मंदिर परिसरात अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. मंदिराचे स्थापत्यकार निखिल सोमपुरा यांनी स्वतःच्या पथकासोबत बुधवारी मंदिर निर्माण कार्यशाळेत कलाकुसर करून ठेवलेल्या दगडांची पाहणी केली आहे. कार्यशाळेतून हे दगड मंदिराच्या स्थळापर्यंत पोहोचविण्याच्या तसेच उर्वरित दगडांच्या कलाकुसरीसाठी 70 एकरच्या क्षेत्रात नव्या कार्यशाळेच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला आहे.









