वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि फ्रान्सने द्विपक्षीय संरक्षण संबंध दृढ करण्याची तयारी केली आहे. फ्रान्सने भारताला पँथर हेलिकॉप्टर्स पुरविण्यासह आणखीन 100 राफेल विमानांप्रकरणी 70 टक्के निर्मिती प्रक्रिया हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांदरम्यान पार पडलेल्या 34 व्या सामरिक चर्चेदरम्यान हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या प्रस्तावामुळे तुलनेत कमी किमतीत भारताला राफेल विमाने उपलब्ध होणार आहेत. भारताच्या वतीने या चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सल्लागार इमॅन्युएल बॉन उपस्थित होते. फ्रान्सने भारताला निर्मितीसह पूर्ण तंत्रज्ञान देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत राफेल विमानांसाठी 70 टक्के आणि पँथर हेलिकॉप्टरसाठी 100 टक्के असेंबली लाइन देण्यात येणार आहे. फ्रान्सच्या प्रस्तावामुळे भारत अधिक संख्येत राफेल विमाने खरेदी करू शकतो.
भारताने यापूर्वीच नौदलासाठी मध्यम आकाराची हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा विचार चालविला आहे. अशा स्थितीत फ्रान्सच्या प्रस्तावामुळे भारतात पँथर हेलिकॉप्टर निर्मितीची योजना योग्य ठरणार आहे. एअरबस एस656 एमबीई विशेष हेलिकॉप्टर असून ते युद्धनौका, किनारी भागात तैनात करता येते. फ्रान्सने भारतीय नौदलाला युरोपियन मेरिटाइम अवेयरनेस इन स्ट्रट्स ऑफ हॉर्मजमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे.
जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा
9900 मेगावॅटच्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आर्थिक मुद्दय़ावरील वादातही काही प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. आण्विक संयत्रांच्या किमतीवरून हा वाद फ्रान्सच्या ईडीएफ आणि भारताच्या न्युक्लियर पॉवर को-ऑपरेशन ऑफ इंडियादरम्यान सुरू होता.
पाकिस्तानवर संतप्त फ्रान्स
पाकिस्तानसोबत संबंध सुरळीत नसल्याचे फ्रान्सने स्पष्ट केले आहे. दहशतवादी घटनेवरून पाक पंतप्रधान इम्रान यांनी थेटपणे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाच लक्ष्य केले होते. फ्रान्स पाकिस्तानला आता शस्त्रास्त्रपुरवठा करणार नसल्याचे आता स्पष्ट आहे.









