नवी दिल्ली
जगभरात कोरोना विषाणू संकटामुळे कामकाज ठप्प झाले आहे. परंतु आता काही देशांमध्ये स्थिती नियंत्रणात येताना दिसून येत आहे. याचदरम्यान सीमेवर चीनशी तणाव सुरू असताना भारतीय संरक्षण दलांसाठी मोठे वृत्त समोर आले आहे. फ्रान्सकडून जुलै महिन्यात प्राप्त होणाऱया राफेल लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीत कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांच्याशी चर्चा केली आहे. राफेल लढाऊ विमान उपलब्ध करण्याप्रकरणी कोरोना महासंकटाला प्रभाव पडणार नसल्याचे आश्वासन फ्रान्सकडून देण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय सुरक्षेसंदर्भात चर्चा केली आहे. तसेच कोरोना संकटाचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. कोरोना संसर्गाने सर्वाधिक नुकसान घडवून आणलेल्या युरोपीय देशांमध्ये फ्रान्स सामील आहे.









