2 कोटी 47 लाखाचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर
प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी तालुक्यातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 8 तलाठी कार्यालय व 2 मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता 2 कोटी 47 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिध्दीपत्रकात आमदार आबिटकर यांनी म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या महसूल विभागाचा तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र अशी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय नसल्याने बहुतांशी तलाठी कार्यालयांचे दैनंदिन कामकाज हे त्या त्या संबंधित मंडल कार्यालय अथवा तालुक्याच्या ठिकाणाहून सुरु आहे.
त्यामुळे महसूल विभागाचा स्वतंत्र तलाठी सजा असूनही तलाठी कार्यालयाची इमारत नसल्याने सर्व सामान्य जनतेला आपल्या कामांकरीता नाहक त्रास होत होता. ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वतंत्र तलाठी सजा असलेल्या परंतु तलाठी कार्यालयाची इमारत नसलेल्या ठिकाणी नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना मंजूरी देण्यात येऊन नविन तलाठी कार्यालय इमारतींच्या कामांना निधी उपलब्ध होणेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उदध्दवजी ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
त्यानुसार सदरील प्रस्तावतलाठी कार्यालय इमारतींचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्त्र व अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडून विभागीय आयुक्त, पुणे यांचेमार्फत शासनाकडे सादर केले. त्यानुसार राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राधानगरी तालुक्यातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 8 तलाठी कार्यालये व 2 मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता 2 कोटी 47 लक्ष रुपये एवढया निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यामध्ये कसबा तारळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीकरीता 33.79 लक्ष, राशिवडे बुद्रुक मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीकरीता 26.40 लक्ष, सोन्याची शिरोली तलाठी कार्यालय इमारतीस 26.72 लक्ष, सिरसे तलाठी कार्यालय इमारतीकरीता 26.51 लक्ष, लिंगाचीवाडी (फराळे) तलाठी कार्यालय इमारत 26.65 लक्ष, फेजीवडे तलाठी कार्यालय इमारतीकरीता 26.75 लक्ष, धामोड तलाठी कार्यालय इमारतीकरीता 26.71 लक्ष, चंद्रे (अर्जुनवाडा) तलाठी कार्यालय इमारतीकरीता 26.54 लक्ष, गुडाळ तलाठी कार्यालय इमारतीकरीता 26.54 लक्ष या नवीन तलाठी कार्यालय इमारतींच्या कामांचा समावेश असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने हि कामे हाती घेण्यात येणार असलेची माहिती आमदार आबिटकर यांनी दिली आहे. तसेच सदर कामांना निधी मंजूर केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.