राधानगरी / प्रतिनिधी
एकाच दिवशी बुधवारी २९ सप्टेंबर रोजी राधानगरी तालुक्यातील अठरा वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचे मोफत लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले. त्या पंचायत समितीच्या शाहू सभागृहात आयोजित कोविड लसिकरणाचे महाशिबिर मोहिमे अंतर्गत तालुक्यातील सर्व लाभार्थीना एकाच दिवशी लसीकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित आरोग्य विभागाच्या नियोजन बैठकीत बोलत होत्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याने २९ सप्टेंबर या एकाच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील अठरा वर्षावरील अडीच लाख लोकांना लसीकरण करण्यासाठी लसीकरण महाशिबिर मोहिम उभारली आहे, त्याअंतर्गत राधानगरी तालुक्यात पंधरा हजारांवर लाभार्थीना लसीकरण करण्याच्या उद्देशाने नियोजन बैठक झाली. यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत राधानगरी आरोग्य विभागाने केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं सांगत, लसिकरणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग वाढवून ज्यास्तीत ज्यास्त लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं.
गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी,आशा,अंगणवाडी सेविका,शिक्षक,महसूल कर्मचारी, ग्राम समित्या आणि खाजगी डॉकटर यांना सामावून घेण्याच्या सूचना केल्या, तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेट्ये यांनी तालुक्यातील फष्ट डोस एक लाख चौदा हजार लसीकरण पूर्ण झाल्याचं सांगत , आरोग्याच्या कामाबाबत राधानगरी तालुका पहिल्या नंबरवर आहे. ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक लसीकरण करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.यावेळी गटशिक्षणाधिकारी बी एम कासार,जयवंत कोरे,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील,आरोग्य विस्तार अधिकारी शहिदा हेरवाडे, आर एस पाटील,एस एम मनुगडे आदींसह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आरोग्य सहायक आणि पंचायत समितीच्या इतर विभागांचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.