शाहूप्रेमी व निसर्ग प्रेमीतून तिव्र नाराजी, नियमबाह्य चुकीच्या लोगोची निवड
प्रतिनिधी / भोगावती
कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशाच्या वनविभागाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेले व गव्यासाठी पहिले राखीव ठेवलेल्या राधानगरी गवा अभयारण्याचा नवा लोगो प्रारंभीच वादग्रस्त ठरला आहे. निवड केलेल्या या लोगोमध्ये राजर्षी शाहु महाराजांच्या कार्याचाच वनविभागाला विसर पडला असल्याचे दिसते.परिणामी शाहुप्रेमीसह निसर्ग प्रेमीतुन याबाबत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. वन्यजीव विभागाच्या नवीन लोगोच्या निवडीत समितीने शाहुराजांनाच बेदखल का केले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तरी स्पर्धेतील अन्य सर्व लोगोंचे पुर्नपरिक्षण करण्याची मागणी होत आहे.
राधानगरी अभयारण्याचा स्वतंत्र लोगो असावा या हेतुने वन्यजीव विभागाने नव्या लोगोची स्पर्धा आयोजित केली होती.त्यासाठी विशिष्ट नियमावली तयार केली होती. त्यानुसार निवड करताना ज्या शाहुराजांनी राधानगरी तालुक्यात पहिले धरण बांधले,पहिले अभयारण्य राखीव ठेवले त्या शाहुराजांनाच लोगोमध्ये कोठेही स्थान दिलेले नसल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडिया वरूनही याबाबत प्रत्येकाकडून नाराजी व्यक्त होत आहे. वन्यजीव विभागाने शाहू महाराजांनी राखीव केलेले देशातील पहीले जंगल, गव्यांसाठी प्रसिद्ध जंगल,देशातले पहिले राधानगरी धरण, फुलपाखरू उद्यान यासह राजर्षी शाहू महाराजांच्या अनेक आठवणी स्पष्ट व्यक्त होतील.असा लोगो असावा असे नियमावलीत नमूद केले होते.
वन्यजीव विभागाकडे जमा झालेल्या लोगोंचे कोल्हापूर येथे प्रदर्शन भरविले होते.या अनुषंगाने बहुतेक सर्वच निसर्गप्रेमी कलाकारांनी शाहू महाराजांना केंद्रस्थानी ठेवून लोगो बनवले होते.परंतु शाहुराजांच्या कार्याची दखल घेणाऱ्या लोगोंना बगल देण्यात आल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवड केलेल्या लोगोमध्ये महाराजांचा पुसटसा उल्लेखही झालेला नाही.शिवाय लोगोतील गव्याचे चित्र ही गव्याचे बोधचिन्ह वाटत नाही.अशा संतप्त प्रतिक्रिया राधानगरी तालुक्यातून उमटत आहेत.तसेच राधानगरी नावाचे स्पेलिंग मिस्टीकसुद्धा झालेले वनविभागाच्या लक्षात आलेले नाही.तरी स्पर्धेतील अन्य सर्व लोगोंचे पुर्नपरिक्षण करुन सर्व नियमानुसार राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा समावेश असलेल्या लोगोची निवड करावी अशी आग्रही मागणी सर्व शाहूप्रेमी व निसर्ग प्रेमीतून होत आहे.