प्रतिनिधी / इचलकरंजी
रुई – कबनूर रस्त्यावरील एका हॉटेल व्यवस्थापकाने रात्री बंद केलेले हॉटेल उघडून जेवण न दिलाच्या कारणावरुन इचलकरंजीतील भाने माळ परिसरातील एका नऊ जणांच्या टोळीने हॉटेलची मोडतोड करीत हॉटेल व्यवस्थापकासह दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. विकास सुभाष पाटील, सुरज नागोंडा पाटील ( दोघे रा. दत्तनगर, कबनूर, ता. हातकांगले ) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांच्या पोटात, छातीवर चाकूने भोसकण्यात आले असून, त्यांच्यावर कोल्हापूरातील राजारामपूरी मधील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या राड्या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील आठ जणांना अटक केली आहे. तर एक जण पसार झाला आहे.
अटक केलेल्यांच्यामध्ये टोळीचा म्होरक्या आफ्रिदी लियाकत बागबान ( वय २५ रा. भोने मळा, इचलकरंजी), मुसवीर इबादुल्ला बागवान ( वय २५ रा. वेताळ पेठ, इचलकरंजी ), सुखमुनी इरान्ना बद्रे ( वय २७ ), संदीप दिलीप पाडळकर ( वय २० दोघे रा. गुरुकनाननगर गल्ली, कबनूर ), किरण राजू गांजवे ( वय २४, रा. लक्ष्मी माळ, कबनूर ), स्वप्नील चिन्नाप्पा केटकाळे ( वय ३५ ), मनोज तुकाराम हसबे ( वय २३ दोघे रा. पंचगंगा साखर कारखाना रोड, कबनूर ) यांचा समावेश आहे. तर सतीश जाधव ( पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही ) हा युवक प्रसार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेची शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, संशयीत आरोपी आफ्रिदी बागवान याने आपल्या सहकाऱ्यांना पार्टीचे आयोजन केले होते. त्यावरुन तो आणि त्याची आठ जणांची टोळी मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रुई-कबनूर रस्त्यावरील एका हॉटेलवर आली. त्यावेळी त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाने हॉटेल बंद केले असून जेवण मिळणार नसल्याचे या टोळीला सांगितले. त्यावेळी या टोळीने काहीही करा, हॉटेल उघडून जेवण द्या, असा रेटा लावला. तरीदेखील हॉटेल व्यवस्थापकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तु जेवण देत नाहीस काय ? तुझे हॉटेल ठेवत नाही, असे म्हणत या टोळीने हॉटेलची मोडतोड करण्यास सुरुवात केली. यावेळी मोडतोड करणाऱ्या या टोळीला अटकाव करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापकासह कामगारांनी धाव घेतली. त्यावेळी या टोळीने त्यांना लाथाबुक्याने मारहाण सुरु केली. तर टोळीचा म्होरक्या बागवान याने आपल्या कबरेला लावलेला चाकू काढून विकास पाटील, सुरज पाटील या दोघांना भोसकले. यामुळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना उपचारासाठी कोल्हापूरातील राजारामपुरीतील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. या झालेल्या राड्याने हॉटेलच्या परिसरात मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. झालेल्या घटनेची माहिती घेवून हॉटेलची मोडतोड आणि दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी करणाऱ्या टोळीचा शोध सुरु केला. बुधवारी दुपार पर्यंत नऊ जणांच्या टोळीतील आठ जणांचा शोध घेवून त्यांना अटक केली. एक जण रात्री उशिरा पर्यंत मिळून आला नव्हता.